कर्जत: रोहित पवार यांच्या पुढाकारातून कर्जत तालुक्यातील राशीन येथील भव्य क्रिकेट स्टेडियमच्या बांधकामाचे भूमिपूजन भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या हस्ते आज झाले. यावेळी हजारोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. रोहित शर्मा व रोहित पवार हे एकाच वेळी उद्घाटनाच्या ठिकाणी आले असता “रोहित…रोहित” असा प्रचंड जयघोष करण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने युवक उपस्थित असल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवणे पोलीस प्रशासन व संरक्षण पथक यांना अतिशय अवघड जात होते. या कार्यक्रमासाठी वातानुकूलित असे भव्य तीस हजार लोकांच्या क्षमतेचे पेंडॉल टाकण्यात आले होते. ते सर्व भरून बाहेर उन्हामध्ये नागरिक उभे होते.
रोहित शर्मा रोहित पवार यांना प्रेक्षकांमध्ये जाण्यासाठी खास वॉक स्ट्रीट तयार करण्यात आला होता. त्यावरून दोघांनीही उपस्थित हजारो नागरिकांना अभिवादन केले. आपल्या भाषणाची सुरुवात रोहित शर्मा याने मराठीतून केली. “कसं काय कर्जत जामखेडकरांनो”, असे रोहितने म्हणताच तरुणांनी प्रचंड जल्लोष केला. यावेळी रोहित शर्मा म्हणाला, “माझं मराठी चांगलं नाही परंतु मी तरी देखील चांगलं मराठीतून बोलणार. वर्ल्ड कप जिंकणे हे आमचं मुख्य लक्ष होतं आणि ते आम्ही साध्य केलं. जेव्हा वर्ल्ड कप जिंकला तेव्हाच माझ्या जीवात जीव आला”
हेही वाचा : आई राजा उदोऽऽ उदोऽऽ घटस्थापनेने तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ
रोहित शर्माची ग्रामीण भागात सुरू होणारी पहिली क्रिककिंग्डम अकॅडमी कर्जत येथे सुरू होणार आहे. ग्रामीण भागातील गरीब मुले आणि मुलींसाठी ही अकॅडमी काम करणार असून यामधूनच देशाचे पुढचे जसप्रीत बुमराह, यशस्वी जयस्वाल असे खेळाडू तयार होतील, असा विश्वास रोहित शर्माने यावेळी व्यक्त केला.
त्यानंतर रोहित पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. रोहित पवार म्हणाले, देशाचा कर्णधार रोहित शर्मा प्रथमच कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये आला आहे. यामुळे प्रचंड उत्साह प्रत्येकामध्ये निर्माण झाला असून आज वर्ल्ड कप मधील एखादी लाइव्ह मॅच सुरू असल्यासारखे या ठिकाणी भासत आहे. या ठिकाणी आल्याबरोबर रोहित शर्मा यांनी क्रिक किंग्डम ही अकॅडमी कर्जत येथे सुरू करण्याचे जाहीर केले आहे. ग्रामीण भागातील गरीब मुले आणि मुलींसाठी ही अकॅडमी काम करणार आहे.
रोहित पवार पुढे म्हणाले, मी पण रोहित शर्मा यांचा फॅन आहे. देशाचा झेंडा छातीवर आणि पाठीवर असतो तेव्हा त्यासारखा सन्मान दुसरा कोणताही नाही. त्यानंतर रोहित पवार यांनी उपस्थितांना रोहित शर्मा यांचा जयघोष करण्याचे आवाहन केले. पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या देशांपर्यंत आवाज गेला पाहिजे, असे रोहित पवारांनी म्हणताच उपस्थित तरुण व क्रिकेटप्रेमींनी “रोहित रोहित” असा प्रचंड जल्लोष केला. यावेळी क्रिकेट स्टेडियम व स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांचे भूमिपूजन झाले. पुढील काही महिन्यांमध्ये कर्जत शहर आणि जामखेड येथे भव्य स्टेडियम कॉम्प्लेक्स, स्विमिंग पूल बांधणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : थायलंडच्या फुलांची जगदंबेच्या चरणी सेवा, एक टन फुलांनी सजला तुळजाभवानी देवीचा दरबार
रोहित पवार व रोहित शर्मा यांच्यात प्रश्न-उत्तरे
रोहित पवार : कर्जत जामखेडमध्ये आल्यावर कसे वाटले?
रोहित शर्मा : पवित्र वाटले. येथील वातावरण खूप चांगले आहे. इथल्या युवकांमध्ये खेळाडूंमध्ये खूप उर्जा आहे. या ठिकाणी मी पुन्हा येणार आहे.
रोहित पवार : मुंबईत तुम्ही क्रिकेट खेळता तेव्हा तिथलं वातावरण आणि कर्जत जामखेडचं वातावरण यामध्ये काय फरक वाटला, कर्जत जामखेडचा आवाज कसा आहे?
रोहित शर्मा : इथल्या जनतेचा आवाज स्टेडियम पेक्षा मोठा आहे.
तीन ‘रोहित’ने गाजवले मैदान
कर्जत तालुक्याचे मैदान रोहित शर्मा, रोहित पवार व पॉप सिंगर रोहित राऊत यांनी गाजवले. यावेळी प्रेक्षकांनी या तिघांनाही अक्षरशः डोक्यावर घेतले होते. यावेळी श्रावणी महाजन व डीजे मराठी क्रेकटिझ यांनी देखील उपस्थित प्रेक्षकांचे मनोरंजन केले. सुमारे चार तास प्रचंड जल्लोषात हा कार्यक्रम संपन्न झाला.