सोलापूर : एकीकडे दहावी व बारावी परीक्षा सुरू असताना दुसरीकडे होळी व धूलिवंदनसारख्या सणामध्ये सोलापुरात प्रचंड प्रमाणात पाणीटंचाई भेडसावत आहे. काही भागात तर चार दिवसाआड नव्हे तर सहा ते सात दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना होळी-धूलिवंदनात पाण्यासाठी शिमगा करावा लागत आहे.
शहरात मागील आठ-नऊ दिवसांपासून पाणीटंचाई भेडसावत आहे. शहरात मुरारजी पेठ, अवंतीनगर, राघवेंद्रनगरासह जुळे सोलापूर, विजापूर रस्त्यावरील सैफुल, स्वामी विवेकानंद नगर, नई जिंदगी परिसर आदी भागात पाणीटंचाई मागील आठ-नऊ दिवसांपासून भेडसावत आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकळी येथील भीमा नदीच्या औज बंधा-यात उजनी धरणातून सोडलेले पाणी उशिरा पोहोचले. पाणी पोहोचल्यानंतरही पाणीपुरवठय़ाचे नियोजन कोलमडले. त्यामुळे नागरिकांना पाण्याविना हाल सहन करावे लागत आहेत.
शहर व परिसरात पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत असताना होळी व धूलिवंदनाचा उत्सव साजरा करण्यात आला. रात्री ठिकठिकाणी सार्वजनिक मंडळांनी होळी पेटवून शिमगा केला. दुसऱ्या दिवशी धूलिवंदनही साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. करोना महामारी आटोक्यात येत असली तरी अद्यापि काही प्रमाणात निर्बंध कायम आहेत. त्यामुळे सार्वजनिक मिरवणुकांना प्रशासनाने परवानगी नाकारली होती. परिणामी चौपाड भागातील राजपूत समाजाची धूलिवंदनाची मिरवणूक यंदा सलग तिसऱ्या वर्षीही स्थगित झाली होती.