जिल्ह्य़ातील सातपुडय़ाच्या पर्वतरांगा पांरपरिक आदिवासी होळी सणात न्हावून निघाल्या असून सर्वत्र होलिकात्सवाचा जल्लोष दिसून येत आहे. ७५० वर्षांपेक्षा अधिकची पंरपरा असलेल्या सातपुडय़ातील काठी संस्थानची मानाची ‘राजवाडी होळी’ गुरुवारी पहाटे पेटविण्यात आली. यावेळी हजारो आदिवासींनी होळीचे दर्शन घेतले.
आदिवासी संस्कृतीत होळी सण मोठा मानला जातो. त्यातही नंदुरबार जिल्ह्य़ातील आदिवासी होळीचा जल्लोष हा सर्वदूर परिचीत झाला आहे. या होलिकात्सोवाचा आनंद घेण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक दाखल होत असतात. चार दिवसांपासून सातपुडय़ातील दऱ्या-खोऱ्यासह संपूर्ण जिल्ह्य़ात होळीचा ज्वर वाढला असून विविध ठिकाणच्या भोंगऱ्या बाजारांनी या होलिकात्सवाला सुरवात झाली होती. या बाजारातून आदिवासी होळीची खरेदी करतात. काठी संस्थानाच्कया राजवाडी होळीला आदिवासींमध्ये विशेष महत्व आहे. होळीत वापरली जाणारी उंच काठी गुजरातच्या जंगलातून आणण्यात आली होती. या ठिकाणी राजा उमेदसिंग यांची गादी आणि त्यांच्या शस्त्रांच्या पूजनानंतर ढोल आणि बिरीच्या तालावर आदिवासी नृत्यांनी सातपुडा गजबजून गेला. गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास ही मानाची काठीची राजवाडी होळी पेटविण्यात आली. काठी प्रमाणेच असली, रोझवा पुनर्वसन, जावदा वसाहत आणि वडछील वसाहतीतही राजवाडी आदिवासी होळीचा उत्सव साजरा करण्यात आला. वडछील वसाहतीमध्ये तर विविध प्रकारच्या आदिवासी पांरपरिक नृत्य, ढोल वाजन अशा स्पर्धा घेण्यात आल्या.
होळीसाठी नवस ठेवून खास बुध्या, बावा, घेर, मोरख्या, कहानडोखा, मोडवी, शिकारी आदि प्रकारच्या पांरपरिक होळीच्या प्रतिकांचा पेहराव आदिवासींनी केला होता. यासाठी होळीच्या पाच दिवस आधीपासूनच ब्रम्हचर्यत्व धारण करावे लागते. खाट अथवा पलंगावर न झोपता जमिनीवर झोपूनच या कार्यकाळात होळीला वंदना दिली जाते. विविध रुप धारण केलेले आदिवासी काठी होळीनंतर तब्बल आठ ठिकाणची होळी पायी जाऊन आपला नवस फेडून होलिकात्सव साजरा करतात. पुढील पाच दिवस काकर्दे, मोलगी, तोरणमाळ, गौऱ्या, सुरवाणी, जामली, जमाना, धनाजे, मांडवी, सुरवाणी, बुगवाडा अशा ठिकाणी होळी उत्सव होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा