अलिबाग-सालाबाद प्रमाणे रायगड जिल्ह्यात होळी आणि धुळवडीचा सण मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. या सणाच्या निमित्ताने चाकरमानी मोठय़ा प्रमाणात जिल्ह्यात दाखल झाले होते. गुरुवारी रात्री जिल्ह्यात ठिकठिकाणी ३ हजार ३९४ होळ्यांचे दहन करण्यात आले तर उत्तर रायगडात गुरूवारी अबालवृध्दांनी रंगलावून धुळवडीचा सण उत्साहात साजरा केला.
कोकणात गणेशोत्सवानंतर होळीचा सण मोठय़ा जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवाला शिमगोस्तव असेही संबधले जाते. सणाच्या निमित्ताने चाकरमानी मोठय़ा प्रमाणात कोकणात दाखल होत असतात. यंदाही मुंबईतील चाकरमानी कोकणात मोठय़ा संख्येनी दाखल झाले होते. होळीच्या सणाच्या निमित्ताने गावागावात विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गावदेवतांच्या पालख्याही काढण्यात आल्या.
जिल्ह्यात यावर्षी २ हजार ८८० सार्वजनिक, तर १ हजार ११९ खासगी अशा एकूण ३ हजार ३९४ होळ्यांचे दहन करण्यात आले. यासाठी सुपारी, नारळ, केळीचे झाडे आणि सावर आणुन होळ्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. होळी भोवती झेंडूच्या पुलांचे आरास करण्यात आले होते. कोळीवाडय़ात काही ठिकाणी पौराणीक आणि ऐतिहासिक देखाव्यांचे चलचीत्रांची उभारणी करण्यात आली होती. रात्री ११ नंतर सर्वत्र होलीकांचे दहन करण्यात आले.
तर शुक्रवारी सकाळपासून उत्तर रायगडात धुळवडीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. अबालवृध्दांनी एकमेकांना रंगलावून होळीच्या शुभेच्छा दिल्या. यात तरूणाई आघाडीवर होती. होळकऱ्यांचे घोळके ढोलताशे वाजवत गल्लोगल्ली रंग उधळत फिरत होते. अलिबाग समुद्रकिनारी रंग खेळणाऱ्यांची जणू जत्राच भरली होती. रंगात रंगलेले होळकरी समुद्रात डुंबायला उतरले होते. काही अतिउत्साही होळकऱ्यांमुळे पोलीस यंत्रणेवर ताण पडलेला पाहायला मिळाला.
बच्चेकंपनीच्या हातात पिचकारी तर तरूणाईच्या हातात सुके रंग होते. हे रंग घेऊन एकमेकांना रंगांची आंघोळ घालीत होते. होळकऱ्यांचे जथ्थेच्या जथ्थे नाक्यानाक्यावर बुरा ना मानो होली है! म्हणत सर्वांना रंगविण्यासाठी सज्ज होते. अगदी ओळखीचे चेहरेही रंगल्यामुळे अनोळखी झाले होते. होळीवर आधारित जुन्या, नव्या हिंदी-मराठी गाणीही वाजत होती. शहरात आणि गावात होळीच्या सणात सारेच मोठय़ा उत्साहाने सहभागी झाले होते. तरूण-तरूणी डिजेच्या तालावर नाचत होती. एकमेकांना रंगात रंगवत होती. रंगाच्या या सणात तरूणाईबरोबरच वयोवृद्ध ही सहभागी झाले होते.
पोलिसांचा बंदोबस्त
होळी आणि धुलीवंदनाच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता . किनारा परीसरात वाहने चालवण्यास मज्जाव करण्यात आला होता तसेच दारू पिवून समुद्राच्या पाण्यात पोहोण्यासाठी जाणाऱ्या अतिउत्साही पर्यटकांना कारवाई करण्याचा इशाराही पोलीसांनी दिला होता. पोलिसांनी ठेवलेल्या बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता होळीचा उत्साहात साजरा झाला. होळीचा दुसरा दिवस म्हणजे करीचा.या वर्षी होळी गुरुवारी साजरी साजरी झाली. आणि शुक्रवारी मांसाहारी खवय्यांची पावले सकाळ पासून मटणाच्या दुकानाकडे वळली. शेकडो कोंबडय़ा, बकऱ्यांनी बलिदान देऊन खवय्यांची भूक भागवली. विशेष म्हणजे आज मासळी बाजारात नेहमी सारखी गर्दी दिसून आली नाही.
समुद्र किनाऱ्यावर गर्दी..
रायगडातील अलिबाग,मुरुड, श्रीवर्धन, उरण या तालुक्याना विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला आहे . एरव्ही बाहेरील पर्यटकांनी हे किनारे फुलून जातात पण आज स्थानिक गावकरी, शहरातील नागरिक या समुद्र किनारी मोठय़ा संख्येने आल्याचे पाहायला मिळाले . समुद्र किनारी धुळवड साजरी करीत अनेकांनी समुद्र स्नानाचा आनंद लुटला.