उत्सवप्रिय कोकणात शिमगोत्सव अर्थात होळी सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच या सणासाठी चाकरमानी मोठय़ा संख्येने कोकणात दाखल होत असतात. पुढील पाच दिवस मोठय़ा उत्साहात शिमगोत्सव साजरा केला जातो.
राज्यभरात हा सण दोन दिवस साजरा होत असला तरी कोकणात शिमगोत्सवाची धूम पाच दिवस असते. रूढी आणि परंपरा जपत मोठय़ा उत्साहात हा सण साजरा केला जातो. होलिका दहनाच्या कार्यक्रमाने या सणाला सुरुवात होते, तर रंगपंचमीच्या दिवशी या सणाचा समारोप होतो. रायगड जिल्ह्य़ातील काही भागात होळीचा सण पाच ते सात दिवस अगोदरपासून सुरवात होते. प्रामुख्याने कोळीवाडय़ात होळीच्या मुख्य सणाच्या अगोदर सात दिवस दररोज छोटय़ा होळ्यांचे दहन केले जाते. होळीच्या आदल्या दिवशी लहान मुलांची होळी साजरी केली जाते. या निमित्ताने समाजप्रबोधन करणारे तसेच पौराणिक देखावे साजरे केले जातात, तर होळीच्या दिवशी समाजाची मोठी होळी साजरी होते. अलिबागमधील कोळीवाडय़ात धूलिवंदनाच्या दिवशी बैलगाडी स्पर्धाचे आयोजन केले जात असते. या बैलगाडी स्पर्धासाठी संपूर्ण अलिबाग तालुक्यातून बैलगाडी स्पर्धक दाखल होत असतात. होळी सणाच्या निमित्ताने होणारे वाद टाळण्यासाठी आणि मुलांना व्यसनाधीनतेतून परावृत्त करण्यासाठी गेल्या शंभर वर्षांहून अधिक कालखंडापासून या स्पर्धाचे आयोजन केले जात आहे. बैलगाडी स्पर्धावर बंदी घातल्यामुळे गेली दोन वर्षे या स्पर्धामध्ये केवळ अश्वशर्यती घेण्यात आल्या होत्या. मात्र या वर्षी बैलगाडी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
तर दक्षिण रायगडात शिमगोत्सवाची सुरवात होळीपासून होते. सणाच्या निमित्ताने गावातील देवतांच्या पालख्या काढल्या जात आहे. घरोघरी जाऊन देवतांच्या पालख्या नाचवल्या जात असल्याचे चित्र सध्या अनुभवायला मिळत आहे. गावकरी मोठय़ा उत्साहात पालखीचे स्वागत करत आहेत. इच्छापूर्तीसाठी शरणही काढण्याची परंपरा पाहायला मिळते आहे. गावातील मुले मनोरंजनासाठी आटय़ापाटय़ासारखे खेळ खेळत असून काही ठिकाणी सोंग काढत गावकऱ्यांचे मनोरंजन केले जाते आहे. शिमग्याच्या निमित्ताने खुले सूर घुमत असून शिमग्याचा उत्साह टिपेला पोहोचला आहे.

Story img Loader