शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थिकलश आज अलिबागमध्ये आणण्यात आला. त्यावेळी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली. बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थिकलशाचे दर्शन जनतेला घेता यावे यासाठी अस्थिकलश नागोठणे, पोयनाडमार्गे अलिबागेत आणण्यात आला. जोगळेकर नाका येथील प्रशांत नाईक यांच्या कार्यालयाच्या मागील प्रांगणात उभारण्यात आलेल्या मंडपात बाळासाहेब ठाकरेंचा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.  शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख बबन पाटील, उपजिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, तालुका प्रमुख हेमंत पाटील आज दुपारी २.०० च्या सुमारास बाळासाहेबांचा अस्थिकलश मंडपात घेऊन आले. नंतर तो दर्शनासाठी ठेवण्यात आला. शेकापच्या आमदार मीनाक्षी पाटील, नगराध्यक्षा सौ. नमिता नाईक, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. कविता गायकवाड, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. सुप्रिया पाटील, जिल्हा परिषद सदस्या सौ. चित्रा पाटील, सौ. चित्रलेखा पाटील, अनिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय कवळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश धुमाळ, संतोष निगडे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष म. हि. पाटील, अलिबाग नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते अ‍ॅड. प्रवीण ठाकूर, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य हर्षल पाटील. काँग्रेसचे अलिबाग तालुका अध्यक्ष अनंत गोंधळी, सुनील थळे, अ‍ॅड. श्रद्ध ठाकून, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश काठे, भाजपाचे अलिबाग तालुका अध्यक्ष सतीश लेले, सुनील दामले, मनसेचे अर्जुन पाटील, राजेश पाटील आदींनी बाळासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. तत्पूर्वी पोयनाड येथे पांडवादेवी, कुर्डुस, मेढेखोर, पेझारी, पळी, तिनविरा येथील शिवसैनिक आणि बाळासाहेबांच्या चाहत्यांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. त्यानंतर अस्थिकलश रथ अलिबागेत आणण्यात आला. ‘बाळासाहेब अमर रहे, बाळासाहेब परत या’ अशा घोषणा शिवसैनिक देत होते.

Story img Loader