औरंगजेबाबाबत केलेल्या विधानानंतर वादास तोंड फोडणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येणार आहे. गृहविभागाने जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याची राजकीय स्थिती पाहता जितेंद्र आव्हाडांच्या जीवाला धोका असल्याचं गृहविभागाने म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर आव्हाडांच्या दौऱ्यात अधिक सुरक्षा तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सुरक्षा वाढवण्याच्या या निर्णयावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “दैनंदिन आयुष्यात असे प्रकार घडत असतात. माझ्या घराची रेकी करण्यापर्यंत लोक गेले होते. त्यांच्यातील काहींना पोलिसांनी पकडलं असून काही जेलमध्ये आहेत. त्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे यात काही नवीन नाही,” असं आव्हाड म्हणाले आहेत.
‘औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा नव्हता’ विधानामुळे वाद
“छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही पहिल्यापासूनच स्वराज्यरक्षक म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला कुणी दिली? इथेच तर खरा इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेण्यात आलं तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचं मंदिर आहे. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही फोडलं असतं. तिथून छत्रपती संभाजीराजेंना तुळापूरला नेण्यात आलं. त्यानंतर पुढे काय झालं तो इतिहास सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळेच मी म्हणतो आहे की उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका. इतिहास वाद वाढवतो,” असं जितेंद्र आव्हाड प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. त्यांच्या याच विधानावरुन वाद निर्माण झाला आहे.