शिवसेना आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार याबाबत नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. दसरा मेळाव्यातील या भाषणांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेत्यांना इशारा दिला आहे. “भाषणं करताना कायदा मोडला तर कायदा आपलं काम करेल” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. नेत्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून भाषणं करावीत, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
“राजकारणात एकमेकांवर टीका केली जाते. विचार मांडले जातात. हे विचार कायद्याच्या चौकटीत राहून खुसखुशीत पद्धतीने, व्यंगातून किंवा अतिशयोक्तीतूनही मांडले जावेत”, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. दोन्ही मेळावे शांततेत पार पडावेत, यासाठी बंदोबस्त करण्यात आला आहे. यादरम्यान कायदा सुव्यवस्था नीट राखली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले आहे.
काही जणांकडून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या घटकांनी गर्दीचा फायदा घेऊ नये, याकडे गृह विभागाचे विशेष लक्ष असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही, याची कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही गृहमंत्र्यांनी केले आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त मुंबईत तैनात करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समर्थक लाखोंच्या संख्येने या मेळाव्यासाठी हजर राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या मेळाव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून टीका करण्यात आली आहे. दसरा मेळाव्यात विचार नाही, तर नाटकं पाहायला मिळतील, असा हल्लाबोल मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना केला आहे. ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांचं वस्त्रहरण करतील, अशी टीकादेखील त्यांनी केली आहे.