Online Betting App : ऑनलाईन बेटिंग ॲपवरून अनेक लोकांची फसवणूक होत असून या माध्यमातून गोळा केलेला पैसा बांधकाम प्रकल्पात गुंतविला जात आहे. तसेच अनेक सेलिब्रिटी आणि युवकांचे आयकॉन असलेले लोक अशा ॲप्सच्या जाहिराती करतात, त्यामुळे अनेक युवक जुगाराच्या ॲप्सच्या अधीन होत आहेत, असा विषय महाराष्ट्र विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला. बच्चू कडू यांनी मागच्या काही काळात ऑनलाईन ॲप्सची जाहिरात करणाऱ्या एका माजी खेळाडूविरोधात आंदोलन केले होते. आज त्यांनी कोणाचेही नाव न घेता, पुन्हा एकदा हा विषय मांडला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन बेटिंग ॲप्स आणि त्याच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींना एक मोठे आवाहन केले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालण्यासाठी केंद्राला कायदा करावा लागेल. ऑनलाईन गेमिंग ॲपची नोंदणी परकीय राष्ट्रात केलेली असते. त्यामुळे त्यावर बंदी घालणे अवघड होते. तसेच जाहिरातींमधून पैसे मिळतात म्हणून अनेक सेलिब्रिटी आणि आयकॉन समजली जाणारी मंडळी अशा ॲप्सच्या जाहिराती करतात. पण या लोकांनी जाहिराती करू नये, अशी विनंती सभागृहाच्या माध्यमातून करत आहे”, अशी भूमिका फडणवीस यांनी व्यक्त केली.
हे वाचा >> “भारतरत्न हा जुगाररत्न…”, सचिन तेंडुलकरविरोधात बच्चू कडू आक्रमक; दानपेटी घेऊन घराबाहेर आंदोलन!
आशिष शेलार यांनी उपस्थित केली लक्षवेधी
महादेव ॲपच्या माध्यमातून देशभरातून ऑनलाईन बेटिंग करण्यासाठी अनेक बेटिंग ॲपची निर्मिती करण्यात आलेली आहे. या बेटिंग ॲप प्रकरणी मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून अमित शर्मा आणि विजय जैन या दोघांची नावे आरोपी म्हणून दाखल करण्यात आली आहेत. या आरोपींनी मुंबईतील काही बांधकाम प्रकल्पात गुंतविले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या बांधकाम प्रकल्पांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करत भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली.
यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेव बेटिंग ॲपचे व्यवहार कसे चालतात, याची माहिती दिली. तसेच हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यातरीत असून त्यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंधाचा तपास केला जात आहे. तसेच राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली असून राज्यातील संबंधाबाबतचा तपास केला जात आहे, दोन महिन्यात हा तपास पूर्ण केला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी आमदार बच्चू कडू यांनी जुगाराच्या अॅपच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींचा विषय उपस्थित केला. या जाहिरातींवर बंदी घालता येऊ शकते का? तसेच इतर राज्यांनी ऑनलाईन गेमवरच बंदी घातली आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्रात बंदी घालता येऊ शकते का? असा प्रश्न बच्चू कडू यांनी विचारला होता. यावर फडणवीस यांनी अशाप्रकारच्या जाहिराती करू नये, अशी विनंती केली.
आणखी वाचा >> ऑनलाइन खेळांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय; ऑनलाइन ‘रमी’ला २१ हजार कोटींचा कर भरावा लागणार?
इन्स्टाग्रामवरून घरपोच अमली पदार्थांची डिलिव्हरी
या विषयाची सखोल माहिती देत असताना फडणवीस म्हणाले की, फक्त ऑनलाईन गेमच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातूनही गैरप्रकार होत असल्याचे सांगितले. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून काही विशिष्ट पोस्ट टाकल्या जातात. त्यावरील कमेंटवरून सांकेतिक संदेश दिले जातात. तिथूनच ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी युपीआय आयडी दिला जातो आणि ग्राहकाच्या घरी कुरिअरने अमली पदार्थ डिलिव्हरी केले जात आहेत. डेटा आणि ऑईल हीच आगामी काळातील दोन मोठी आव्हाने आपल्यासमोर आहेत. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर चाललेले सर्व गैरप्रकार नियंत्रणात आणण्यासाठी तज्ज्ञांचे पथक गठीत केले असून या गैरप्रकारांना आळा घालण्याचा आमचा प्रयत्न असेल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही ऑनलाईन जुगारांना पूर्णपणे निर्बंध घालावेत, अशी मागणी केली. यावर फडणवीस म्हणाले की, हा विषय खूप मोठा आहे. वरकरणी बंदी घातली तरी या गोष्टी डार्क नेटवर चालतात. त्यामुळे केंद्र सरकारशी याबाबत चर्चा करून राज्य आणि केंद्राचे कार्यक्षेत्र ठरवून पुढील निर्णय घ्यावे लागतील, असे सांगतिले. नाना पटोले, वर्षा गायकवाड, आदित्य ठाकरे यांनीही आपले विचार व्यक्त केले.