परीक्षा ऑनलाइन घ्यावी या मागणीसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद येथे विद्यार्थी या मागणीसाठी रस्त्यावर उतरले. तर, धारावीमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केलं होतं. परीक्षा ऑनलाइन घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांना असलेल्या प्रश्नांसंदर्भात भूमिका मांडायची होती, तर त्यांनी ती राज्य सरकारसमोर मांडायला हवी होती, असं गृहमंत्री म्हणाले. तसंच विद्यार्थी स्वतःहून रस्त्यावर आल्याचं आपल्याला वाटत नाही. यामागे कोणीतरी आहे. जाणीवपूर्वक विद्यार्थांना आंदोलन करायला लावलंय, अशी शक्यता व्यक्त करत आपण पोलीस विभागाला चौकशीचे आदेश दिल्याचंही त्यांनी सांगितलं.”
“गेल्या दोन दिवसांत जेवढे व्हिडीओ व्हायरल झाले, ज्याच्या माध्यमातून विद्यार्थांना भडकवण्यात आलं. मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये आंदोलन करण्यात आलं. हे सर्व ठरवून झालं असून यामागे नक्कीच कोणत्यातरी संघटनेचा हात आहे, त्याचा तपास पोलीस करतील, असं मंत्री वळसे पाटील म्हणाले. तर, विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड निर्णय घेतील,” असं त्यांनी सांगितलं.
“विद्यार्थांनी घरी बसून शांततेत अभ्यास करावा, सरकारला देखील तुमच्या हिताची काळजी आहे. सरकार विद्यार्थांना मदत करणारी भूमिका घेईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. तसेच चौकशीअंती दोषींवर कारवाई करण्यात येईल,” असंही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.
आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, संघटनांनी मुलांना रस्त्यावर आणू नये – वर्षा गायकवाड
”परीक्षा घेत असताना आम्ही सर्व बाबींचा विचार करत आहोत. संघटनांनी मुलांना रस्त्यावर आणणं योग्य नाही. काही गोष्टी बोलायच्य असतील तर ते आमच्याशी चर्चा करू शकतात. आम्ही चर्चा करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. त्यानुसार आम्ही शिक्षण तज्ज्ञांशी देखील चर्चा करू. विद्यार्थ्यांच्या काही सूचना असतील तर त्या ऐकण्यासाठी सरकार व शिक्षण विभाग तयार आहे.” अशी प्रतिक्रिया शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.