राज्यातील मशिदींवरील भोंगे काढून टाकण्याची मागणी केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादमध्ये १ मे रोजी सभा घेणार आहेत. राज ठाकरे यांनी ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे हटविण्याची मागणी केली असून, त्यास भाजपाने पाठिंबा दिल्याने राज्यात वातावरण तापले आहे. मात्र सभेला प्रशासनाने मात्र अद्याप परवानगी दिली नसल्याने संभ्रम कायम आहे. मनसे नेते मात्र मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभा घेण्यावर ठाम आहेत. याबाबत आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना याबाबत भाष्य केले आहे.
राज ठाकरेंना सभेसाठी परवानगी मिळणार की नाही याबाबत गृहमंत्र्यांनी भाष्य केले आहे. “सर्व पक्षांच्या बैठकीत सर्व चर्चा करण्यात आली आहे. त्यानंतरही त्यांना जाहीर सभा घ्यायची असेल तर त्याबाबत काय निर्णय घ्यायचा हा औरंगाबाद पोलीस आयुक्तांचा अधिकार आहे. याबाबत सरकार निर्णय घेणार नाही,” असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले.
“औरंगाबाद येथील राज ठाकरे सभेबाबत एक दोन दिवसांत औरंगाबाद पोलीस आयुक्त निर्णय घेतील. ते त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आणि पोलीस महासंचालकांसोबत चर्चा करत आहेत. परिस्थिती पाहून त्यासंदर्भातील निर्णय आयुक्त घेतील,” असे वळसे पाटील म्हणाले. कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर सरकार कारवाई करेल, असा इशाराही दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.
औरंगाबादमध्ये जमावबंदी नाही
राज ठाकरेंच्या सभेआधी औरंगाबाद पोलिसांनी सणवार तसंच विविध आंदोलनांची कारणं देत जमावबंदी लागू केल्याची चर्चा होती. आदेशामध्ये मनसेने मशिदींवरील भोंगे काढण्यासंबंधी दिलेल्या इशाऱ्याचाही उल्लेख असल्याचं बोललं जात होतं. पण पोलीस आयुक्तांनी ही सर्व चुकीची माहिती असल्याचं स्पष्ट केलं आहे.
औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी सांगितलं की, “ही चुकीची माहिची आहे. कलम १४४ संबंधी कोणताही आदेश काढण्यात आलेला नाही. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी, नागरिकांच्या हालचाली, काठ्या, शस्त्रं बाळगणं यावर आम्ही लक्ष ठेवून असतो. ही एक सामान्य प्रक्रिया आहे. वर्षभर असे आदेश काढले जातात”.
दरम्यान, लाउडस्पीकरबाबत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश देशभरासाठी लागू असल्याने गरज भासल्यास समान नियमावलीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेईल. याबाबत केंद्राने निर्णय घ्यावा, अशी भूमिका राज्य सरकारने सोमवारी सर्वपक्षीय बैठकीनंतर मांडली. मशिदींवरील भोंगे हटविण्याची मागणी केल्यानंतर या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. राज्य सरकार विरोधकांना दहशतीने दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचे कारण देत भाजपाने बैठकीवर बहिष्कार टाकला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: उपस्थित न राहता माजी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांना बैठकीसाठी पाठविले.