गेल्या काही दिवसांपासून राज्यात भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या गुढी पाडव्याच्या मेळाव्यात मशिदींवरील भोंगे काढले नाही, तर त्यासमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा वाजवण्याचं आवाहन केलं होतं. या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. राज ठाकरेंनी ठाण्यातल्या सभेत ३ मेपर्यंतचा अल्टिमेटमच दिला असून त्यानंतरची परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस देखील सक्षम असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. यासंदर्भात आज पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची आज राज्यातील वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक देखील उपस्थित होते. या बैठकीसंदर्भात देखील वळसे पाटील यांनी माहिती दिली. “राज्यात लाऊडस्पीकरचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याबाबत राज्याच्या पोलीस महासंचालकांना आढावा बैठक घ्यायला सांगितली होती. त्याप्रमाणे त्यांनी काल बैठक घेऊन त्याचा अहवाल दिला. येत्या काही दिवसांत राज्यात जी परिस्थिती उपस्थित होऊ शकते, त्याबाबत उपाययोजना करण्याच्या दृष्टीने काय तयारी केली आहे, याबाबतच आढावा त्यांनी मला दिला आहे”, असं वळसे पाटील म्हणाले.
“कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न सुरू”
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं गृहमंत्री यावेळी म्हणाले. “कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. पण गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याबाबत सरकार अतिशय गंभीर आहे. माझी सर्वांना हीच विनंती आहे की कायदा हातात घेण्याचा कुणीही प्रयत्न करू नका. संघर्ष वाढवू नका. तेढ निर्माण करू नका. अशी कृती कुणाकडून झाली, तर त्याबाबत कठोर कारवाई केली जाईल. शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाईल”, असा विनंतीवजा इशाराच दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.
राज ठाकरेंसह विरोधी पक्षनेत्यांची बैठक घेणार
दरम्यान, या मुद्द्यावर राज ठाकरे यांच्यासह राज्यातील सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेणार असल्याचं वळसे पाटील म्हणाले. “मी यानिमित्ताने एक सांगू इच्छितो की हा मुद्दा काही नवीन नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल २००५ साली आला आहे. त्यानंतर २०१५ आणि २०१७ साली काही जीआर निघाले. त्यात अशा प्रकारच्या लाऊडस्पीकरच्या परवानगीची पद्धत ठरवून दिली आहे. परंतु, यासंदर्भातला अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मी राज्यातल्या सर्व प्रमुख विरोधी पक्षनेत्यांची बैठक बोलवून याबाबत चर्चा करणार आहे. राज ठाकरेंनाही या बैठकीला बोलावणार आहे”, असं ते म्हणाले.
“पोलिसांची परवानगी घेऊनच लाऊडस्पीकर लावायला हवेत. ज्यांना तशी परवानगी नाही, त्यांना हे लाऊडस्पीकर लावता येणार नाही. जे लाऊडस्पीकर लावतील, त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्णयाच्या आधारे राज्य सरकारने काढलेल्या जीआरनुसार ते लावावेत. सरकारने कुठला लाऊडस्पीकर काढायचा किंवा लावायचा याबाबत प्रश्न उद्भवत नाही”, असं देखील वळसे पाटील म्हणाले.