राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. आधी राज ठाकरेंनी ठाण्यातल्या सभेमध्ये शरद पवार यांच्यावर जातीपातीच्या राजकारणाचा आरोप केल्यानंतर त्याला बुधवारी खुद्द शरद पवारांनीच पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं आहे. या पार्श्वभूमीवर मनसेकडून संदीप देशपांडे यांनी आज सकाळी बाबासाहेब पुरंदरेंनी जेम्स लेनच्या पुस्तकाबाबत लिहिलेलं पत्र जाहीर केल्यानंतर त्यावरून वाद सुरू झाला आहे. यासंदर्भात शरद पवारांनी माफी मागावी अशी मागणी करणाऱ्या मनसेला आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे.
“जेम्स लेननं केलेल्या गलिच्छ लिखाणाला माहिती देण्याचं काम बाबासाहेब पुरंदरेंनी केलं. त्याचा खुलासा पुरंदरेंनी कधी केला नाही. म्हणून त्यांच्यावर टीका-टिप्पणी केली असेल, तर मला त्याचं दु:ख वाटत नाही तर अभिमान वाटतो”, असं शरद पवारांनी म्हटल्यानंतर त्यावर संदीप देशपांडेंनी बाबासाहेब पुरंदरेंनी १० नोव्हेंबर रोजी ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला लिहिलेलं एक पत्र जाहीर केलं आहे.
काय लिहिलंय या पत्रात?
एका शिवप्रेमीने आपल्याला हे पत्र पाठवल्याचं देशपांडे म्हणाले. या पत्रात नमूद करण्यात आलेला मजकूर देखील त्यांनी वाचून दाखवला. “ज्यांच्यावर कोट्यवधी भारतीयांचं प्रेम आहे, त्यांच्याबद्दलचे निराधार आरोप आम्ही सहन करणार नाही. जेम्स लेन यांनी त्यांच्या पुस्तकात हेच केलं आहे. हे पुस्तक तुमच्याकडून प्रकाशित होत आहे. शिवाजी महाराज आणि दादोजी कोंडदेवांविषयी जेम्स लेननं जे विधान केलंय, ती त्याच्या घाणेरड्या मनोवृत्तीची उत्पत्ती आहे. त्यामुळे प्रकाशक आणि लेखकांनी २५ नोव्हेंबर २००३ पर्यंत कोट्यवधी भारतीयांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागावी आणि हे पुस्तक भारत आणि परदेशातूनही मागे घ्यावं. जर प्रकाशक आणि लेखकानं असं काही केलं नाही, तर भारत सरकारने या पुस्तकावर बंदी घालावी आणि त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती आम्ही करू”, असं या पत्रातून बाबासाहेब पुरंदरे आणि इतर इतिहासकारांनी ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला सांगितल्याचं संदीप देशपांडे म्हणाले.
“…आता शरद पवारांनी महाराष्ट्राची माफी मागावी”, मनसेनं बाबासाहेब पुरंदरेंचं ‘ते’ पत्र केलं जाहीर!
“मनसेलाच माफी मागावी लागेल”
याच पत्राच्या आधारे आता शरद पवारांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, असं मनसेकडून सांगण्यात आलं आहे. यावरून दिलीप वळसे पाटील यांनी मनसेला प्रत्युत्तर दिलं आहे. “मनसेला अशा प्रकारची माफी अनेक वेळा मागावी लागेल. शरद पवारांनी माफी मागायचा प्रश्न येत नाही”, अशा सूचक शब्दांत वळसे पाटलांनी उत्तर दिलं आहे.
“भोंग्यांविषयी कोणताही निर्णय नाही”
“न्यायालयीन निर्णयाचा जो आधार घेतला जातो, तो असा आहे की रात्री १० पासून सकाळी ६ पर्यंत लाऊडस्पीकर मोठ्याने लावू नये. त्यामुळे न्यायालयाने कुठेही मंदिर, मशिदींवरील परवानगी घेऊन लावलेल्या भोंग्यांविषयी निर्णय दिलेला नाही”, असं देखील दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी नमूद केलं.