साकीनाका येथे ३० वर्षीय महिलेवर बलात्कार आणि खून प्रकरणात आरोपी मोहन चौहानला दिंडोशी सत्र न्यायालयाने दोषी ठरवले होते, त्यानंतर आज(गुरुवार) त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे. न्यायालयाने सर्व आरोपांमध्ये त्याला दोषी ठरवलं आहे. मुंबईतील या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. बलात्कारानंतर महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला होता. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई पोलिसांचे कौतुक केले आहे.

गृहमंत्री वळसे यांनी म्हटले की, “मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला दिंडोशी सत्र न्यायालयाने आज फाशीची शिक्षा सुनावली. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे सांगत सरकारतर्फे आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. साकीनाका घटनेतील मुंबई पोलिसांचा ‘रिस्पॉन्स टाइम’ हा १० मिनीटे इतका जलद होता. या बलात्कार व हत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी अत्यंत जलदगतीने पूर्ण केला. संबंधित आरोपीविरोधात सर्व पुरावे जमा करून पोलिसांनी अवघ्या १८ दिवसांत दिंडोशी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.”

साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी मोहन चौहानला फाशी; दिंडोशी सत्र न्यायालयाचा निर्णय!

या निकालामुळे न्याय व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल तसेच याद्वारे महिला सुरक्षितता आणि महिलांच्या सन्मानाविषयी महाराष्ट्र पोलिस अत्यंत जागरूक असल्याचा संदेश समाजात पोहोचावा, अशी अपेक्षा गृहमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

साकीनाका परिसरात झालेल्या संतापजनक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक करत आरोपपत्र दाखल केलं होतं. या घटनेत एकच आरोपी आहे. पोलिसांनी ७७ साक्षीदारांचे जबाब नोंद करुन ३४६ पानांचे आरोपपत्र दाखल केलं होतं.

नेमकं काय घडलं होतं?

खैरानी रोड साकीनाका येथे एक पुठ्ठ्याची कंपनी आहे. १० सप्टेंबर २०२१ च्या रात्री ३ वाजून २० मिनिटाच्या दरम्यान त्या कंपनीच्या सुरक्षारक्षकाने कंट्रोल रुमला फोन करून एका बाईला मारहाण सुरु असल्याचं कळवलं होतं. माहिती मिळाल्यानंतर कंट्रोल रुमने संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलिसांना कळवलं होतं. संबंधित अधिकारी दहा मिनिटाच्या आत तिथे पोहोचले होते. तिथे त्यांना एका उघड्या टेम्पोत महिला अत्यंत गंभीर अवस्थेत आढळली होती. त्यावेळी पोलिसांनी महिलेला इतरत्र कुठे शिफ्ट न करता त्या टेम्पोची चावी वॉचमनकडून घेऊन टेम्पो चालवत तिला राजावाडी रुग्णालयात नेलं होतं. डॉक्टरांनी त्या महिलेवर त्वरीत उपचार सुरु केले होते. सुरक्षारक्षकाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Story img Loader