गृह खाते हे राष्ट्रवादीच्या नेत्याकडे असले तरी ते राज्य शासनाचा एक भाग आहे. शासनाने चांगले काम केल्यास त्याचे श्रेय घ्यायचे आणि अपयश आले तर राष्ट्रवादीला जबाबदार धरायचे हे योग्य नाही. संयुक्तपणे काम करताना यशाबरोबर अपयशाचेही धनी व्हावे लागते, असे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला महिनाभराचा कालावधी उलटूनही तपासात काहीच प्रगती झाली नाही. या प्रश्नावर उत्तर देताना जाधव यांनी काँग्रेसला तर सुनावले, शिवाय त्यांच्या प्रदेशाध्यक्षांकडून लोकसभेसाठी केल्या जाणाऱ्या २९ जागांची मागणी धुडकावत राष्ट्रवादी २२ पेक्षा एकही कमी जागा घेणार नसल्याचे सांगितले.
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने येथे आयोजित नाशिक विभागीय शिबिराचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी जाधव यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष शरद कोशिरे, शहराध्यक्षा सुनीता निमसे यांच्यासह युवती काँग्रेसच्या विभागीय संघटक अमृता पवार आदी उपस्थित होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना जाधव यांनी मुख्यमंत्री व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नामोल्लेख टाळून टीका केली. नाशिक महापालिकेतील सत्ताधारी मनसेने ‘गोदा पार्क’ प्रकल्प खासगीकरणातून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणावर टीका करणे सोपे असते, परंतु प्रत्यक्षात काम करताना किती अडचणींना सामोरे जावे लागते त्याचे रखडलेला हा प्रकल्प उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्राची सत्ता आपल्या हाती द्या, अशी भाषणबाजी करणाऱ्यांना साधी महापालिका योग्य पद्धतीने चालविता येत नाही. नियोजनबद्ध विकासासाठी दृष्टी लागते. त्यांच्याजवळ ती दूरदृष्टी नाही. कोणताही प्रकल्प प्रसिद्धीसाठी येतो की विकासासाठी ते पाहून राष्ट्रवादीने आपली भूमिका निश्चित केली असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. मागील अकरा वर्षांत पवार यांनी क्रिकेट क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांची बरोबरी कोणी करू शकणार नाही. तसेच पवार यांची कोणाशी तुलना करणेही योग्य होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी लोकसभेसाठी २९ जागांची मागणी केली आहे. त्यावर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस २२ पेक्षा एकाही जागेत तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले.