सांगली : तेलंगणामधील भारत राष्ट्र समितीमध्ये गेलेल्यांच्या अपेक्षा फोल ठरल्याने घरवापसी सुरू झाली आहे. यामुळे कोण बाहेर पडला तरी राष्ट्रवादीवर परिणाम होणार नाही. नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेउन राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार सामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील रहा असा सा प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला. शनिवारी सांगलीत पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक पार पडली. यावेळी आमदार पाटील बोलत होते.
आ. पाटील म्हणाले, काही महिन्यापुर्वी तेलंगणातील बीआरएस या पक्षाचा मोठा गाजावाजा होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत या पक्षाचा पराभव झाला. त्याठिकाणी काँग्रेसने कष्ट घेतले. त्यांना लोकांनी सत्ता दिली. बीआरएसमध्ये काही आमच्या पक्षातील लोक गेले होते. त्यांचाही आता भ्रमनिरास झाला असून ते पुन्हा आमच्याकडे येत असून त्यांची घरवापसी होत आहे.
आणखी वाचा-आमदार जयंत पाटलांची हुकुमशाही- भाजपा जिल्हाध्यक्ष निशीकांत भोसले-पाटील
ग्रामीण भागात आजही शेतकर्यांचा नेता म्हणून शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे.हा मतदार राष्ट्रवादीपासून दूर करण्यासाठी एका पक्षाने बीआरएसला सांगितले होते. मात्र, राष्ट्रवादीमध्येच फूट पडल्याने बीआरएसची आता गरजच उरलेली नाही अशी त्या पक्षाची मानसिकता झाली असल्याने काही तरी पदरात पडेल म्हणून गेलेल्यांचा भ्रमनिरास झाला.
जिल्ह्यातही काही मंडळी दुसर्या गटात गेली असली तरी चिंता करण्याचे कारण नाही. पक्षाध्यक्ष पवार यांच्या विचारावर विश्वास असलेली मंडळी आजही पक्षासोबत आहेत. गेलेल्यांची चिंता न करता नव्या कार्यकर्त्याना सोबत घेउन पक्षाचा विचार सामान्य माणसापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आपण सर्वजण मिळून करूया असेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.