संपूर्ण वर्षभरात विविध राज्य तसेच राष्ट्रीय मैदानी स्पर्धामध्ये गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंचा जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. या वेळी उत्तर प्रदेशातील इटावा येथे आयोजित राष्ट्रीय शालेय स्पर्धेत दोन सुवर्णपदके मिळविल्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारकडून मिळालेली नॅनो कार धावपटू अंजना ठमकेच्या स्वाधीन करण्यात आली.
या सोहळ्यात एकूण २० खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. त्यात आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, मोनिका आथरे, अंजना ठमके, दुर्गा देवरे, किसन तडवी आदींचा समावेश आहे. प्रारंभी संघटनेचे उपाध्यक्ष डी. के. झरेकर यांनी प्रास्ताविक केले. पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी खेळाडूंची कामगिरी दिवसेंदिवस अशीच उंचावत राहो, अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘साई’चे अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी २०१२-१३ या वर्षभरात संघटनेच्या वतीने खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला. त्यानंतर विभागीय आयुक्त रवींद्र जाधव यांच्या हस्ते अंजना ठमकेला नॅनो कारची चावी देण्यात आली. या वेळी महापाालिका आयुक्त संजय खंदारे, पोलीस महानिरीक्षक धनंजय कमलाकर, जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष तथा चौधरी यात्रा कंपनीचे संचालक ब्रिजमोहन चौधरी, विलास लोणारी आदी उपस्थित होते. 

Story img Loader