सांगली : अचानकपणे उद्भवणाऱ्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापन सज्ज असणे आवश्यक असते. या अनुषंगाने अचानक उद्भवलेल्या आपत्ती परिस्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापन व रुग्णालयात कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिलेले प्रशिक्षण उपयुक्त ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी व्यक्त केला. मेहता हॉस्पिटल येथे आयोजित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

शासकीय रुग्णालय, मिरजचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, डॉ. अजित मेहता, डॉ. पराग शहा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफीक नदाफ, अग्निशमन अधिकारी सुनील माळी, डॉ. संजय पाटील, डॉ. अनिरुध्द पाटील उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, नागरिकांच्या, रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे. अचानक उद्भवलेल्या आपत्ती परिस्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी काय करावे, कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, याची मानसिकता तयार होण्यासाठी अशी प्रशिक्षणे आवश्यक आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालये व अन्य खासगी रुग्णालयात हा उपक्रम राबवला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सोदाहरण सांगितले. यावेळी हॉस्पिटल सेफ्टी प्लॅन तयार करण्याबाबतची माहिती प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूरचे डॉ. संजय पाटील यांनी व रुग्णालयात आगीबाबत दुर्घटना घडू नये यासाठी आग प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांनी मेहता हॉस्पिटलमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्राथमिक अग्निशमन उपकरण वापरण्याचे प्रशिक्षण दिले.