सावंतवाडी : पुण्यावरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकाला दोरीने बांधून हॉटेल व्यवसायिकाकडून बेदम मारहाण झाल्याची घटना कुडाळ येथे घडल्याने एकच खळबळ उडाली आहे . याप्रकरणी सहा जणांविरुद्ध कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पत्रकारांना दिली. पुणे कात्रज येथील पर्यटक गोव्याला जात होते गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर झाराप झिरो पॉईंट येथे एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी हे पर्यटक थांबले. चहा घेताना एका कपात माशी पडली त्यामुळे त्यांनीही चहा बदलून द्या असे सांगितले त्यावरून हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली त्याचे पर्यावसान मारहाणीत झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हॉटेल व्यवसायिकासह अन्य काही जणांनी या पर्यटकाचे हातपाय बांधून त्याला उताणी रस्त्यावर झोपवले आणि मारहाण केली. सकाळी हा प्रकार घडला. मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची रहदारी होती महामार्गावरून प्रवास करणाऱ्या एका ने ११२ नंबर ला कॉल केला आणि या घटनेची पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ पोलीस ठाण्याची टीम घटनास्थळी तात्काळ दाखल झाली आणि त्या पर्यटकांची सोडवणूक केली असल्याचे मगदूम यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांच्या वतीने या घटने विरोधात तक्रार देण्यात आली आणि मारहाण करणाऱ्या व त्यांना सहाय्य करणाऱ्या सहा जणांविरुद्ध कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याचे सांगितले. याबाबत पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिलेल्या माहितीनुसारकुडाळ पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ३८/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११५(२),१८९(२)१२६(२),१९१(२)१९०,११८(१)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल

योगेश मुंढे यांनी दिली आहे.हागुन्हा दि.६ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ ते ६.३० वा. चे मुदतीत मुंबई गोवा महामार्गावर झाराप झिरो पॉईंट वर घडला आहे. याप्रकरणी तनवीर करामत शेख, शराफत अब्बास शेख (वय-५७,) अब्बास उर्फ साहिल शराफत शेख (वय-१८,) श्रीम. परवीन शराफत शेख (वय-४२,) श्रीम. साजमीन शराफत शेख (वय -१९), तलाह करामत शेख (वय-२६ )सर्व रा.-झाराप खान मोहल्ला ,ता-कुडाळ यांच्यावर गुन्हा दाखल केला असून झाराप झिरो पॉईंट येथे मुंबई गोवा महामार्ग लगत असलेल्या हॉटेल जवळ ही घटना घडल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पत्रकारांना सांगितले. याबाबतचा तपासतपासीक अधिकारी – पोलिस उपनिरीक्षक श्री कराडकर करीत आहेत. घटनास्थळी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि सहाय्यक पोलीस फौजदार जाधव या दोघांनी भेट देऊन पाहणी केल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबतची हकीकत,यातील साक्षीदार रुपेश बबन सपकाळ (वय-३३ वर्षे ) रा. कात्रज, जिल्हा -पुणे व त्यांचे मित्र असे संशयित आरोपी क्रमांक तनवीर शेख यांचे हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबलेले असताना चहाच्या कपात माशी पडली म्हणून साक्षीदार यांनी चहा बदलून मागितला तो बदलून दिला नाही म्हणून चहाचे पैसे देणार नाही असे साक्षीदार यांनी सांगितले असता त्याचा त्याला राग येऊन त्यांच्यासह सर्वांनी मिळून बेकायदा जमाव करून साक्षीदार यांना काठीने व हाताच्या ठोस्यांनी मारहाण करून साक्षीदार याचा मित्र संजय सुदाम चव्हाण रा. -पुणे यालाही मारहाण केली तसेच साक्षीदार रुपेश सपकाळ यांचे कपडे फाडून त्यांचे हातपाय दोरीने बांधून त्यासअटकावून ठेवले असल्याचे सांगितले त्या घटनेचे वृत्त परिसरात समजतात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी कर्तव्य भावनेतून स्वतः फिर्यादी होऊन फिर्याद दिली आहे, असे पोलिस निरीक्षक यांनी सांगितले.