विदर्भात सलग दुसऱ्या दिवशी तापमानाने उच्चांक गाठला असून चंद्रपुरात ४८.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. एप्रिलपासून आतापर्यंत आलेल्या उष्णतेच्या तीव्र लाटेत आतापर्यंत ६ लोकांचा मृत्यू झाला. नागपूर ४७.८, ब्रम्हपुरी ४७.८, वर्धा ४७.५ ही शहरेदेखील आठवडाभरापासून तापलेली आहेत. काही स्वयंसेवी संस्था तसेच खगोल अभ्यासकांनी चंद्रपूर शहरातील सोमवार आणि आज मंगळवारचे तापमान ४८.२ अंशापेक्षा अधिक असल्याची नोंद घेतली असल्याचा दावा ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.
नव तपा सुरू होण्याच्या पूर्वीपासूनच सूर्याने अक्षरश: आग ओकायला सुरूवात केलेली आहे. विदर्भात सर्वदूर उष्णतेची लाट वाहायला सुरूवात झाली असून चंद्रपूरचा आजचा पारा तब्बल ४८.२ अंशावर पोहोचला. दुपारी आता लोकांनी घराच्या बाहेर पडणे बंद केले आहे. दुपारी एक दीड वाजताच्या सुमारास एखाद व्यक्तीच रस्त्याने जाताना दिसते. एरवी कडक उन्हात शहरातील मुख्य रस्ते संचारबंदी लागल्यासारखी स्थिती आहे. येत्या २५ मे पासून नवतपाला सुरूवात होत आहे. जून पर्यंत राहणार आहे. त्यामुळे चंद्रपूरकरांना आणखी किमान पंधरा दिवस तरी ४८ अंश तापमानात उन्हाचे चटके सहन करीत दिवस काढावे लागणार आहे.
उन्हामुळे दुपारच्या नागपूर, गडचिरोली, वर्धा व यवतमाळ या बसफेऱ्या सुध्दा कमी झालेल्या आहेत. ज्या कुणाला नागपूरला जायचे असतो तो पहाटे निघून जातो. त्यामुळे एस.टी. महामंडळाचा खर्च कमी करणसाठी म्हणून उन्हाळय़ातील दुपारच्या फेऱ्या कमी केल्या आहेत. शहरातील काही स्वयंसेवी संस्थेच्या मते उन्हाचा पारा हा ४८.२ अंशापेक्षा कितीतरी जास्त आहे. मात्र, शासनाच्या वतीने त्याची नोंद घेतल्या जात नाही.
ग्रीन प्लॅनेट सोसायटी व स्काय वॉच ग्रुपचे सुरेश चोपणे यांनी तर शहरातील काही भागांमध्ये आठवडाभरापासून ४८.२ डिग्री तापमानाची नोंद घेतल्याचे म्हटले आहे. वेकोलिच्या कोळसा खाणी व ऊर्जा प्रकल्पांमुळेच या शहरातील उष्णतेत दरवर्षी वाढ होत असल्याचा इशारा अभ्यासकां दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा