सोलापूर : शहराजवळ कुंभारी येथे माकपचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांच्या पुढाकाराने केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने साकार होणाऱ्या ३० हजार असंघटित कामगारांना रे नगर योजनेतून पक्की घरे दिली जाणार आहेत. या महत्वाकांक्षी गृहप्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात उभारलेल्या १५ हजार घरांचा ताबा लाभार्थी असंघटित कामगारांना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा येत्या १९ जानेवारी रोजी सोलापूर दौरा नियोजित आहे. या दौऱ्याच्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या नियोजित दौऱ्याला फक्त आठवड्याचा कालावधी उरला असला तरी प्रत्यक्षात अधिकृत दौरा निश्चित झाला नाही. नवी दिल्ली आणि मुंबईहून वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांकडूनही दौरा नियोजनाचा आढावा घेण्यात आला नाही. त्यामुळे मोदी यांच्या दौऱ्याविषयी संभ्रमावस्था आहे. दरम्यान, पंतप्रधानांचा नियोजित दौरा गृहीत धरून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी आढावा बैठक घेऊन प्रत्येक शासकीय यंत्रणेला जबाबदारी निश्चित केली आहे.
हेही वाचा – सत्तेत असणाऱ्यांच्या तोंडी मणिपूरचे नाव नाही – कन्हैय्याकुमार
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, प्रांताधिकारी विठ्ठल उदमले, रे नगर फेडरेशनचे प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम, अध्यक्षा नलिनी कलबुर्गी, सचिव युसूफ शेख आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, पंतप्रधानांच्या सोलापूर दौऱ्यासाठी खूप कमी कालावधी असल्याने सर्व संबंधित विभागांनी दिलेली जबाबदारी अत्यंत चोखपणे व अधिक प्रभावीपणे पार पाडतील, असा विश्वास व्यक्त केला. असंघटित कामगारांना घरे हस्तांतरित करताना पंतप्रधान मोदी हे सुमारे एक लाख जनसमुदायाला संबोधित करणार आहेत. कुंभारीत रे नगर प्रकल्पाजवळ पंतप्रधान मोदी यांना हेलिकॉप्टरने पोहोचण्यासाठी दोन हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत.