मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाचा यंदा पहिल्यांदाच दसरा मेळावा मुंबईमधील वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर पार पडत आहे. या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमधून शिंदे समर्थक आमदार आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. जालन्यामधूनही शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो शिंदे समर्थक कार्यकर्ते समृद्धी महामार्गावरुन मंगळवारीच मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र, उदघाटनापूर्वीच कार्यकर्त्यांसाठी महामार्ग कसा काय खुला करण्यात आला? असा प्रश्न काँग्रेसचे जालना मतदारसंघाचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी उपस्थित केला आहे.
नक्की वाचा >> Dasara Melava: शिंदे गट आणि ठाकरे गट समर्थक मुंबईत आमने-सामने आल्यास…; विश्वास नांगरे पाटील म्हणाले, “एकमेकांच्या समोर…”
खोतकर आणि त्यांचे समर्थक समृद्धी महामार्गावरुन शेकडोंच्या संख्येनं गाड्यांमधून प्रवास करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ ड्रोनच्या माध्यमातून शूट करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावर भगवे झेंडे लावलेल्या गाड्या दिसत आहेत. शक्तिप्रदर्शनच्या हेतूने जारी करण्यात आलेल्या या व्हिडीओवरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. स्थानिक आमदार गोरंट्याल यांनी शिंदे समर्थकांना समृद्धी महामार्ग वापरण्याची परवानगी कशी देण्यात आली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
नक्की वाचा >> ‘‘खोके’वाल्यांचा अधर्म…’, ‘पुढच्या पिढीला कळणारदेखील नाही की, भाजपा…’; दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरेंकडून हल्लाबोल
“मला आमच्या अधिकृत लोकांकडून माहिती मिळाली आहे. शिंदे गटाची रॅली माझ्या घरासमोरुनच गेली. १०० पर्यंत गाड्या होत्या. यांनी दावा केला आहे की १५०० गाड्या गेल्या. मात्र त्या दिसल्या नाहीत. तरी १०० च्या आसपास गाड्या नक्की गेल्या,” असं गोरंट्याल यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीत सांगितलं. मात्र त्याचप्रमाणे त्यांनी अद्याप सामान्यांना समृद्धी महामार्ग वापरण्याची परवानगी नसल्याचा मुद्दा अधोरेखित केला.
“समृद्धी महामार्ग सामान्य लोकांसाठी बंद आहे. मात्र वैजापूरपर्यंत त्यांनी (शिंदे गट समर्थकांनी) समृद्धी महामार्गावरुन प्रवास केला. त्यांना कोणी परवानगी दिली? यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला हवेत. शासनाकडून अपेक्षा आहे की तुम्ही गुन्हे दाखल करा. सामान्य माणूस गेला तर त्याच्याकडून दंड आकारला जातो आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात. हे कोण राजा-महाराज आहेत का? त्यांना काय सर्व माफ आहे का?” असा प्रश्न गोरंट्याल यांनी विचारला आहे.