महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबई महापालिकेने कोविड सेंटरच्या माध्यमातून सुजित पाटकरला १०० कोटींचं कंत्राट दिलं. या प्रकरणी सुजित पाटकरविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे. किरीट सोमय्यांनी हा सगळा घोटाळा कसा झाला हेदेखील सांगितलं.
काय म्हटलं आहे किरीट सोमय्यांनी?
तत्कालीन महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई महानगरपालिकेनी २०२० मध्ये सुजित पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीला सुमारे अर्धा डझन मेगा कोविड सेंटर चालवण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले. १०० कोटींच्या कॉन्ट्रॅक्टसाठी ६००० वैद्यकीय आणि अर्ध वैद्यकीय कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती, त्यावेळेला लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीकडे त्यांच्या पॅरोलवर फक्त १८ कर्मचारी होते. १०० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट देताना ही कंपनी अस्तित्वातच नव्हती असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्यांनी केला आहे.
कंपनीकडे फक्त ५० हजारांचं भांडवल
कंपनीच्या भागीदारांकडे या कंपनीसाठी फक्त ५० हजारचे भांडवल होते. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, मंत्रालयाच्या नेत्यांना ही एक गोष्ट म्हणजेच अदृश म्हणजे भूत कंपनी असल्याचे माहित होते. या कंपनीकडे आयकर खात्याचा पॅन कार्ड नंबर नव्हता, जीएसटीचे रजिस्ट्रेशन ही नव्हते, बँक अकाऊंट नव्हते.असे असतानाही मुंबई महापालिका, महाराष्ट्र सरकार, पुणे मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी (PMRDA) यांनी श्री. सुजित पाटकरच्या या कंपनीला १०० कोटींचे कोविड सेंटर चालवण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले.
या कंपनीला ५० ICU युनिट चालवण्याचे सुद्धा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले, एका ICU युनिट मध्ये १० ICU कोविड बेड असतात, म्हणजेच ICU युनिट चालवण्यासाठी या कंपनीला २००० लोकांच्या मनुष्यबळाची गरज होती.
याच कंपनीला १००० खाटांचे ऑक्सिजन आणि विना ऑक्सिजन कोविड बेड हॉस्पिटल चालवण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले होते. म्हणजेच ICU युक्त व विना ICU बेड साठी या कंपनीला एकंदर ६००० मनुष्यबळ, कर्मचाऱ्यांची गरज होती.अस्तित्वात नसताना फक्त १८ लोकांचा स्टाफ (कर्मचारी) आपल्या पेरोल (Payroll) वर असताना, भांडवल रु. ५०,००० असताना श्री. सुजित पाटकर आणि त्यांच्या भागीदार यांनी १०० कोटींचा मोठा कोविड सेंटर चालवण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला. या कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ३ रुग्णांचे मृत्युही झाले, या कंपनी व कंपनीचे भागीदार यांच्या विरोधात या कंपनी कंपनीचे भागीदार सुजित पाटकर यांच्या विरोधात पोलिसांनी मनुष्यवध भा.द.वि. ३०४ च्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.