स्वित्झर्लंडमधील डाव्होस येथे भरलेल्या जागतिक आर्थिक परिषदेतून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ लाख ४० हजार कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केले, अशी माहिती राज्य सरकारच्यावतीने देण्यात आली आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत गेले होते. उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस हे काही कारणामुळे डाव्होसला जाऊ शकले नव्हते. तसेच १९ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत मेट्रो आणि इतर कामांच्या उद्घाटनासाठी येत असल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांना डाव्होसचा दौरा अर्धवट सोडून परतावे लागले. उद्योग मंत्री उदय सामंत आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या डाव्होसमधील उपस्थितीबाबत वेगवेगळे दावे केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. उद्य सामंत आणि दीपक केसरकर यांच्या पत्रकार परिषदेमधून ही विसंगती समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज (दि. २५ जानेवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे ७६ तास डाव्होसमध्ये होते आणि ते केवळ चार तास झोपत होते, असा दावा केला आहे. डाव्होस दौऱ्यात तब्बल ३५ ते ४० कोटींचा खर्च झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी शिंदे यांचे कौतुक करत असताना हा दावा केला आहे.
हे वाचा >> डाव्होसमध्ये ७६ तासांत मुख्यमंत्री फक्त ४ तास झोपले? दीपक केसरकरांच्या दाव्याची चर्चा; म्हणाले…
मात्र उद्योग मंत्री उदय सामंत हे डाव्होस दौऱ्यावरुन २० जानेवारी रोजी जेव्हा परतले होते. तेव्हा त्यांनी मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डाव्होसमध्ये २८ तास असल्याचे म्हटले होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डाव्होसमध्ये नेमके किती तास होते? यावरुन संभ्रम निर्माण झाला आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत नेमकं काय म्हणाले?
उदय सामंत यांनी सांगितले की, “डाव्होसमध्ये दोन किलोमीटर परिसरात जागतिक आर्थिक परिषदेचे शिबीर भरले होते. महाराष्ट्राच्या पॅव्हेलियनमध्ये अनेक देशांचे प्रमुख, भारतातील इतर मुख्यमंत्री आणि उद्योजक भेट देत होते. मुख्यमंत्र्यांचे डाव्होसमधील वास्तव्य हे फक्त २८ तासांचे होते. पण या २८ तासांत ते महाराष्ट्रात ज्या गतीने काम करतात, त्याच्या दुप्पट गतीने डाव्होसमध्ये काम करत होते.”
हे ही वाचा >> डाव्होसमध्ये नेमकं काय घडलं? उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फक्त २८ तास…“
खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये ७ मिनिट ३० सेकंद या वेळेला जाऊन तुम्ही मंत्री उदय सामंत यांचे मुख्यमंत्र्यांचे वास्तव्य फक्त २८ तास होते, हे वक्तव्य ऐकू शकता.
मुख्यमंत्री यांच्या डाव्होस दौऱ्याचे वेळापत्रक काय होते
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १६ जानेवारी रोजी डाव्होसला रवाना झाले होते. याबाबत त्यांनी सीएमओ महाराष्ट्र या ट्विटर हँडलवर ट्विट देखील केले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १८ जानेवारी रोजी दुपारी डाव्होसमधून परतले होते. याबाबतही सीएमओ महाराष्ट्र या अकाऊंटवर ट्विट आहे. मुंबईत परतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधत त्यांनी दौऱ्याबाबतची माहिती दिली होती. डाव्होसमध्ये मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी १ लाख ४० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले असल्याचे सरकारने सांगितले आहे. या करारांमुळे महाराष्ट्रात एक लाखापेक्षा जास्त प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डाव्होसवरुन परतल्यानंतर दिली होती.
दोन्ही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या डाव्होसमधील उपस्थितीबाबत वेगवेगळा दावा केला असला तरी सरकारच्या म्हणण्यानुसार हा दौरा यशस्वी झालेला आहे. आतापर्यंत १ लाख ४० हजार कोटींची गुंतवणूक आली नव्हती. ती या दौऱ्यामुळे आलेली आहे. आता केवळ हे करार कधी प्रत्यक्षात उतरणार याची उत्सुकता विरोधकांना लागलेली आहे. या दौऱ्यात महाराष्ट्रात आधी पासूनच असलेल्या तीन कंपन्यांसोबत करार केले गेले, अशी टीकाही विरोधकांनी केली होती. त्या टीकेलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देताना सांगतिले की, या भारतीय कंपन्या जॉईंट वेंचरमध्ये आहेत, त्यामुळे त्यांचा उल्लेख झालेला आहे.