राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल(सोमवार) राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने, राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत सत्तारांनी २४ तासांच्या आत माफी मागावी असा अल्टिमेटम दिला आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, सत्तारांच्या या वक्तव्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना(शिंदे गट) प्रवक्ते विजय शिवतारे यांनी प्रसारमाध्यमांसमोर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर ५० खोके घेतल्याचा आरोप करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना, सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – ५० खोके घेतल्याचा आरोप अजित पवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरेंना भोवणार?; शिंदे गटाचा मोठा निर्णय!

विजय शिवतारे म्हणाले, “अब्दुल सत्तारांनी काल केलेलं वक्तव्य हे १०० टक्के निषेधार्ह आहे. पक्षाची ही भूमिका मी पक्षाचा अधिकृत प्रवक्ता म्हणून मी सांगत आहे. कोणीही याला समर्थन करणार नाही. परंतु महाराष्ट्राच्या जनतेला दुसरी बाजू सुद्धा कळली पाहिजे. मी ५० आमदारांच्यावतीने सांगतोय हे वक्तव्य का आलं, काल त्यांची मर्यादा सुटली आणि त्यांची जीभ घसरली. पण हे का झालं? प्रत्येक आमदार हा चार-पाच लाख जनतेमधून निवडून येतो आणि त्यांना तुम्ही ५० खोके घेतले असं म्हणून चार महिन्यांपासून बदनाम करत आहात. माणूस किती दिवस संयम ठेवणार? सत्तारांचा संयम काल सुटला? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी काल त्यांना समज दिली. परंतु एखाद्या जनावरालाही आपण अतिशय त्रास दिला तर तेही आपल्यावर हल्ला करतं. ही सर्वसामान्य प्रवृत्ती आहे. हे तर आमदार इतक्या लोकांमधून निवडून आलेले आहेत, त्यामुळे सगळ्यांना अतिशय त्यामुळे त्रास होतो आहे. म्हणून कुठे ना कुठेतरी ही न घडणारी गोष्ट घडलेली आहे. आमच्या पक्षाच्यावतीने आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. त्यांचं ते विधान निषेधार्ह आहे.”

हेही वाचा – “२४ तासांच्या आत नाक घासून सुप्रिया सुळेंची माफी मागा, अन्यथा…”; अब्दुल सत्तारांना राष्ट्रवादी काँग्रेसचा अल्टिमेटम!

याचबरोबर “सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगाव, की जवळपास चार महिने आपण हे आरोप करत आहात तर आपल्याकडे काय पुरावे आहेत? कोणत्या आधारावर तुम्ही हे आरोप करत आहात. महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल तुम्ही का करत आहात? हे सरकार अतिशय शिस्तपद्ध पद्धतीने अतिशय खूप मोठे निर्णय घेत आहे. जनसामान्याची चांगली कामे होत आहे, त्यापासून लोकांना बाजूला करण्यासाठी तर हे चालेलं नाही ना?” असंही शिवतारे यावेळी म्हणाले.

हेही वाचा – … तेव्हा शिंदे गट आणि भाजपाच्या पायाखालची जमीन सरकली – सुषमा अंधारेंचं विधान!

याशिवाय “जर सुप्रिया सुळे असं म्हणत असतील की ५०-५० खोके घेऊन हे सरकार बनलेलं आहे. तर ज्यावेळी सरकार बनवण्यासाठी अजित पवार सकाळी गेले होते त्यावेळी त्यांना किती खोके मिळाले होते? जरा विचारून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं. १९७८ मध्ये शरद पवारांनी काँग्रेसचं सरकार पाडून पुलोदचं सरकार केलं. ३८ आमदार फोडले होते आणि नवीन सरकार केलं, मग त्या ३८ आमदारांना किती खोके दिले होते तेही सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांना विचारावं आणि आम्हाला सांगावं. १९९९ साली काँग्रेस फोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली बरेचजण इकडे आले, तेव्हा किती खोके दिले तेही आपण सांगावं. २०१९ मध्ये शिवसेनेला भाजपापासून बाजूला करत, शरद पवारांनी नवीन सरकार बनवलं त्यावेळी शिवसेनेला किती खोके दिले होते? याच्याबद्दलही त्यांनी सांगायला हवं.” असा म्हणत विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा – ‘जे’ औरंगजेबलाही जमलं नाही ते आता उद्धव ठाकरे करत आहेत – आशिष शेलार

“दुसरी बाजू ही आहे की, चार महिने जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून निव्वळ राजकारण करत महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचं घातकी काम हे सगळेजण करत आहेत. त्या अॅक्शनवर काल रिअॅक्शन झाली. त्याचं समर्थन आम्ही करत नाही. परंतु ती अॅक्शनला रिअॅक्शन आहे. महिलांच्याबाबत कुठलीही चुकीची वक्तव्य करू नयते, ही आमची संस्कृती आहे.” असं म्हणत विजय शिवतारेंनी शिंदे गटाची भूमिका यावेळी स्पष्ट केली.