Jaydeep Apte : मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही दिवसांपूर्वी कोसळला. गेल्या डिसेंबर महिन्यात या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. आठ महिन्यांच्या कालावधीत पुतळा कोसळल्याने शिल्पकार जयदीप आपटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात साडेपाच कोटींचा खर्च जिल्हा नियोजनामधून करण्यात आल्याचा दावा आमदार वैभव नाई यांनी केला आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊनया कामातील भ्रष्टाचारावरून सरकारवर टीका केली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर अनेक गोष्टी आता उघड होऊ लागल्या आहेत. खरेतर मूर्तीकार आपटे यांना २६ लाख रुपये आतापर्यंत पोहोच झाले आहेत, अशी माहिती पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्यानंतर या पुतळ्याच्या कामामध्येसुद्धा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. पोलीस तपासही गुपचूप झाला. पोलीस तपासात काय निष्पन्न झाले हे सामान्य जनतेला कळाले पाहिजे म्हणून माहिती जाहीर करणे आवश्यक होते. पण तसे झाले नाही”, असं वैभव नाईक म्हणाले.
हेही वाचा >> मालवण येथील कार्यक्रम नौदलाचा, सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनमधून साडेपाच कोटींचा खर्च का केला? – आमदार वैभव नाईक
अनावरण कार्यक्रमासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या राजकोट येथील पुतळा अनावरण आणि नौसेना दिनाच्या कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजनमधून ५ कोटी ५४ लाख रुपये खर्च झाले आहेत. त्यामध्ये हेलिकॉप्टर इंधन, डीव्ही कार, शासकीय वाहने यांचे इंधन यासाठी ३७ लाख ९० हजार, मान्यवर निवास व्यवस्था आणि भोजन व्यवस्था २५ लाख ५० हजार, मंडप २ कोटी, बॅरिकेटिंग दीड कोटी, इंटरनेट, पाणीपुरवठा, ओळखपत्र छपाई यासाठी १८ लाख ५० हजार आणि जिल्ह्याबाहेरून येणारे पोलीस, अधिकारी, कर्मचारी यांचे निवास आणि भोजन यासाठी १ कोटी २२ लाख ४५ हजार असे एकूण ५ कोटी ५४ लाख ३५ हजार रुपये जिल्हा नियोजन मधून खर्च झल्याचा तपशील आमदार वैभव नाईक यांनी यावेळी सादर केला.
जयदीप आपटेला २६ लाख रुपये दिले
यावेळी नाईक पुढे म्हणाले, आमच्या माहिती प्रमाणे हे पैसे जिल्हा नियोजन आणि नौदल या दोघांकडूनही खर्च झाले आहेत. कारण नौसेना कोणत्याच विषयावर काहीच बोलत नाही. पुतळा प्रकरणात नौसेना गप्प आहे. २६ लाख रुपये शिल्पकार जयदीप आपटे याला मिळाल्याचा आमचा आरोप आहे. त्यावरसुद्धा नौसेना काहीच बोलत नाही. त्यामुळे नौसेना कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजनमधून पैसे खर्च करण्यात आले आहेत आणि हे पैसे नौसेनेसुद्धा खर्च केले आहेत. मग एकाच कामावर दोघांकडून खर्च कसा? असा सवाल वैभव नाईक यांनी उपस्थित करत यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.