जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये अंतोदय व प्राधान्य कार्ड धारकांसाठी अल्प दरामध्ये गहू व तांदूळ वितरित होण्यास आरंभ झाला असला, तरी देखील सुमारे 50 टक्के कार्डधारकांची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी प्रक्रिया पूर्ण न झाल्याने ते या लाभापासून वंचित राहत आहेत. जव्हार व मोखाडा तालुक्यात या महिन्यात तेल वितरणासाठी आले नसून संपूर्ण जिल्ह्यात डाळी व साखर मिळत नसल्याने फक्त तांदूळ व गहू खाऊन कसे जगायचे?  असा प्रश्न आदिवासी बांधवांकडून विचारला जात आहे.

अंतोदय कार्डधारकांना 25 किलो तांदूळ,  दहा किलो गहू तर प्राधान्य कार्डधारकांना प्रत्येक सदस्याला तीन किलो तांदूळ दोन किलो गहू माफक दराने वितरित करण्याचे काम सुरू झाले आहे. असे असले तरी जिल्ह्यातील अनेक ठिकाणे स्वस्त धान्य दुकानापर्यंत एप्रिल महिन्याचा साठा वितरणासाठी पोहोचला नसल्याच्या तक्रारी येत आहेत. एप्रिल महिन्यातील वितरण झाल्यानंतर पुढील काही दिवसात प्रत्येक कार्डधारकाला पाच किलो मोफत तांदूळ  वितरण करण्याची व्यवस्था सुरू होईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सांगितले आहे.

यंदाच्या वितरणामध्ये चणा डाळ, उडीद डाळ,  तूर डाळ व साखर यांचा समावेश झाला नसून त्यांची उपलब्धता होताच त्याचे वितरण करण्यात येईल असे शासकीय अधिकारी सांगत आहेत. आपल्या कार्डाची ऑनलाइन नोंदणी झाली नसल्याने अनेक कार्डधारक तासंतास लाईनमध्ये थांबून देखील त्यांना स्वस्त धान्य मिळत नसल्याची परिस्थिती समोर आली आहे. अशा कार्डधारकांसाठी हंगामी व्यवस्था उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. बहुतांश गरीब कुटुंब आपल्या हातातली कामधंदे सोडून तसेच रोजगार हमीची कामे अर्धवट सोडून आपल्या मूळ गावी परतले आहेत. रोजगार हमी योजने अंतर्गत  दोन महिन्यांपासून रोजंदारी मिळाली नसून नागरिकांकडे आर्थिक चणचण आहे. अशा परिस्थितीत जेवण तयार करण्यासाठी मसाले, तेल, भाजीपाला व इतर सामग्री विकत आणण्यासाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न अरुत्तरित राहत आहे.

पालघर जिल्ह्यातील अधिकतर लाभधारक गव्हाचा वापर आपल्या दैनंदिन जेवणामध्ये करता नसून गव्हा ऐवजी तांदूळ देण्याची मागणी आपण अनेक वर्षांपासून करीत आहोत असे श्रमाजिवीचे संस्थापक विवेक पंडित यांनी सांगितले. अजूनही जिल्ह्यातील ग्रामीण भागात एप्रिल महिन्याची स्वस्त धान्य वितरण सुरू झाले नसून याबाबत त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. एकीकडे घरातून बाहेर निघाल्यावर पोलिसांकडून विचारणा व वेळप्रसंगी मारहाण होत असताना, स्वस्त धान्य दुकानात वेगवेगळ्या वस्तू आणण्यासाठी गरीब नागरिकांवर फेऱ्या मारण्याची नामुषकी ओढावली आहे.

Story img Loader