२० ऑगस्ट २०१३ या दिवशी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. डॉक्टर दाभोलकर मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांची हत्या झाली. या घटनेने सगळं राज्य हादरलं. दाभोलकर हत्येचा खटला पुण्यातल्या विशेष सीबीआय न्यायालयात सुरू आहे. सनातन या संस्थेच्या पाच जणांच्या विरोधात या संबंधीचे आरोप निश्चित करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास करणारे सीबीआयचे तत्कालीन तपास अधिकारी एस. आर. सिंग यांनी न्यायालयात शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांनी नरेंद्र दाभोलकरांची हत्या कशी केली याचा घटनाक्रम सांगितला आहे.
कसा होता नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा घटनाक्रम
२० ऑगस्ट २०१३ या दिवशी संभाजीनगर (पूर्वीचं औरंगाबाद) मारेकरी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर पुण्यातील शिवाजीनगर बस स्टॉपवर आले. त्यानंतर शनिवार पेठ या ठिकाणी असलेल्या एका घरात हे दोघे आहे. तिथे एक मोटरसायकल त्यांच्यासाठी तयार ठेवण्यात आली होती. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांनीही डॉ. नरेंद्र दाभोलकर ज्या इमारतीत राहायचे तिथली पाहणी केली. साधना मीडिया सेंटरच्या समोरच ही इमारत आहे. या इमारतीतून डॉ. दाभोलकर मॉर्निंग वॉकसाठी निघाले आणि पाठोपाठ सचिन अंदुरे आणि शरद कळसकरही निघाले होते. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर आले. त्यापाठोपाठ त्यांचे मारेकरी शनिवार पेठ येथील पोलीस चौकीसमोर दबा धरून बसले. डॉक्टर दाभोलकर पुलावरून परत जाण्याची ते वाट बघत होते.
पुलावर नेमकं काय झालं?
डॉ. दाभोलकर पुलावर आले होते त्यानंतर शरद कळसकर आणि सचिन अंदुरे पुढे सरसावले आणि त्यांनी डॉक्टर दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर लगेचच ते मोटरसायकलवरून फरार झाले. हा सगळा प्रकार पुलावर स्वच्छता करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनी पाहिलं होतं. त्यांची साक्ष ही या संपूर्ण प्रकरणात अत्यंत महत्त्वाची ठरली. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सचिन अंदुरे, शरद कळसकर, विरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.
तत्कालीन सीबीआय अधिकारी एस. आर. सिंग यांनी कोर्टात हा संपूर्ण घटनाक्रम कथन केला आहे. डॉ. विरेंद्र तावडे आणि नरेंद्र दाभोलकर यांच्यात वैचारिक मतभेद होते असंही सिंग यांनी सांगितलं. डॉक्टर दाभोलकर यांच्या हत्येला दहा वर्षे उलटली आहेत. या दहा वर्षात आरोपींना अटक झाली आणि खटला दाखल करण्यात आला आहे. मात्र निकाल कधी लागणार आणि शिक्षा कधी ठोठावणार हा प्रश्न विचारला जातो आहे.