राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी अलीकडेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. गेल्या काही वर्षात अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत. दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीतून अजित पवारांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला आहे. दहावीत नापास का झालो? याचा खुलासाही अजित पवारांनी मुलाखतीद्वारे केला आहे.
तुमचं शिक्षण कुठे झालं आणि शाळेतल्या आठवणी काय आहेत? या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “बारामतीमधील ‘बाल विकास मंदिर’ येथे माझं प्राथमिक शिक्षण झालं. आमच्या सगळ्या भावंडांचं आणि बहिणींचं शिक्षण इथेच झालं. माझे सख्खे चार भावंडं आणि आमची मोठी बहीण रज्जो आक्का, आम्ही पाचजण तिथेच एकत्र असायचो.”
हेही वाचा- “…हा आततायीपणा आहे”, अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच्या मागणीवर गिरीश महाजनांचं विधान
अजित पवारांनी पुढे सांगितलं, “रज्जो आक्काचे वडील लवकर गेल्यामुळे आमच्या मोठ्या काकीच आमच्या सर्वांची काळजी घ्यायच्या. बारामतीतच आम्ही लहानाचे मोठे झालो. आमच्या सगळ्यांचं प्राथमिक शिक्षण बालविकास मंदिर येथे झालं. सगळ्यांचं हायस्कूलचं शिक्षण बारामतीमधील ‘एमईएस’मध्ये झालं. शरद पवारांच्या सगळ्या भावंडांचं आणि नंतर आमचं सगळ्यांचं शिक्षण तिथेच झालं. ‘एमईएस’ ही शाळा १९११ साली स्थापन झाली होती. त्यामुळे पवारसाहेबांची पिढी आणि आमच्या पिढीचं शिक्षण तिथेच झालं.”
हेही वाचा- शरद पवारांनी राजकारणातील कोणत्या गोष्टी शिकवल्या? अजित पवार म्हणाले, “मला…”
दहावीत नापास कसा झालात?
“दहावीत असताना मी मुंबईला आलो. गिरगावमधील विल्सन हायस्कूलला मी प्रवेश घेतला होता. पण दुर्दैवाने मी दहावीत नापास झालो. माझा एक विषय राहिला. मला मुंबई मानवली नाही आणि मला अपयश मिळालं. पण एक विषय राहिल्यामुळे मला पुन्हा मुंबईला जावं लागलं. राहिलेल्या विषयात मी पुढच्या वर्षी पास झालो. त्यानंतर मी कोल्हापूरला शहाजी कॉलेजला प्रवेश घेतला आणि कॉलेजचं शिक्षण तिकडे पूर्ण केलं. शेवटचं एक सत्र बाकी असल्यामुळे मला बी. कॉमची पदवी मिळाली नाही. त्यामुळे मी निवडणुकीचा फॉर्म भरताना त्यात बारावी पास असंच लिहितो,” असंही अजित पवारांनी सांगितलं.