शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच जनतेची संवाद साधला आहे. शिवसेना आणि हिंदुत्व कदापी वेगळं होऊ शकत नाही, म्हणत त्यांनी बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केलं आहे. मी याक्षणी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा द्यायला तयार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केलं आहे.

“होय, संघर्ष करणार” अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्वीट सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. येथून पुढे उद्धव ठाकरे बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दुसरीकडे, संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी विधानसभा बरखास्तीच्या दिशेनं जात असल्याचं ट्वीट केलं होतं. त्यांच्या या ट्वीटमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी राजीनामा देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केलं आहे.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “समोर बसा. मी आज माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार ठेवतो आहे. हा कुठेही लाचारीचा प्रसंग नाही. मजबुरी अजिबात नाही. काय होईल जास्तीत जास्त? परत लढू. जोपर्यंत माझ्यासोबतच शिवसैनिक आहेत, तोपर्यंत मी कोणत्याही संकटाला भीत नाही. मी आज शिवसैनिकांनाही आवाहन करतोय. ही शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असं जे म्हणतात त्यालाही माझ्याकडे उत्तर आहे. जर शिवसेनेच्या कार्यकर्त्याला वाटत असेल की मी शिवसेना प्रमुख पद सांभाळायला नालायक आहे, तर मी शिवसेना प्रमुखपदही सोडेन. पण समोर येऊन सांगायला हवं. मी मुख्यमंत्रीपद आणि शिवसेना प्रमुखपद सोडेन. मी मुख्यमंत्रीपद सोडून पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होत असेल, तर मला आनंद आहे. पण एकदा मला समोर येऊन सांगा. समोर या, आणि सांगा”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Story img Loader