महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं आहे. तसेच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या असून अयशस्वी झालेल्या विद्यार्थ्याचं मनोबल वाढवलं आहे.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणाले की, आयुष्यात परीक्षेतील यशाला महत्त्व असतेच. परीक्षा भविष्यात येणाऱ्या आव्हानांची तयारी करून घेते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. यानंतर सुरू होणाऱ्या शैक्षणिक वाटचालीसाठी आणि आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये भविष्य घडवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. या वाटचालीतून तुम्हाला आपल्या कुटुंबियांसह, समाज आणि देशाचे भविष्य उज्वल करण्याची संधी मिळणार आहे, या संधीचे आपण सोने कराल, हा विश्वास आहे. काहींना या टप्प्यावर यशाने थोडक्यात हुलकावणी दिली असेल, अशांनीही खचून न जाता पुन्हा एक संधी म्हणून नव्या जोमाने तयारी केल्यास, यश तुमचेच असेल. त्यासाठीही त्यांनी शुभेच्छा दिल्या.
दुसरीकडे, बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील अभिनंदन केलं असून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. बारावीची परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील एक टप्पा असून अंतिम साध्य नाही, त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थी व पालकांनी निराश न होता, खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत. शिक्षणाच्या बरोबरीनं कला, क्रीडा, तांत्रिक कौशल्य विकसित करुन जीवनात यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
यंदा ९४.२२ टक्के विद्यार्थी बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थीनींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण दोन टक्के अधिक आहे. मुली या मुलांपेक्षा चांगली कामगिरी करत आहेत, ही सुद्धा समाधानाची बाब असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी नमूद केले. बारावीनंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारकिर्द ठरवण्याचा, भविष्यातील वाटचाल ठरवण्याचा निर्णय घ्यायचा असतो. विद्यार्थ्यांची आवड, कल लक्षात घेऊन हा निर्णय विद्यार्थी व पालकांनी मिळून घ्यावा, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटलं आहे.