विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने इयत्ता १२ वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर विषयांच्या नियामक बैठकांवर बहिष्काराचे अस्त्र परजले आहे. त्यानुसार येथील रंगुबाई जुन्नरे विद्यालयात आयोजित इंग्रजी विषयाच्या नियामकांची बैठकही झाली नाही.
बैठकीसाठी विभागातील चारही जिल्ह्यांतील नियामक जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह उपस्थित होते. राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने १२ वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घोषित केलेला असल्याने विभागीय शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आलेल्या १०० नियामकांची द्वारसभा घेऊन बहिष्कार आंदोलन तीव्र करण्याचे आवाहन करताच सर्व नियामकांनी एकमुखाने सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. कुठल्याही प्रकारची नियामक बैठक नाशिक विभागाची झालीच नाही. त्यातून शिक्षकांनी आपल्या मागण्यांची तीव्रता शासनास कळावी यासाठी बहिष्कार टाकत असल्याचे पत्र इंग्रजी विषय नियामकांनी पदाधिकाऱ्यांसोबत मंडळाचे सचिव भगवानराव सूर्यवंशी यांना दिले. आंदोलन यशस्वी करण्यासाठी राज्य महासंघाचे कार्याध्यक्ष प्रा. संजय शिंदे, विभागीय अध्यक्ष प्रा. जे. एस. अहिरराव, नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रा. के. एन. अहिरे आदींनी प्रयत्न केले. यापुढील नियामक बैठकांनाही अनुपस्थित राहून आंदोलन १०० टक्के यशस्वी करण्याचे आवाहन विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

Story img Loader