संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यातील शेवटचे गोल तर दुसरे उभे रिंगण बाजीराव विहीर याठिकाणी अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडले. मुखी ‘ज्ञानोबा तुकाराम’ व वरून पावसाची रिमझिम, त्यामुळे वैष्णव खऱ्या अर्थाने भक्तिरसात भिजून चिंब झाले होते. माउलींच्या पालखी सोहळा भंडीशेगावकरांचा निरोप घेऊन दुपारी एक वाजता पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. सोहळा तीनच्या सुमारास बाजीरावाची विहीर या ठिकाणी रिंगणासाठी थांबला. पावसाच्या हलक्या सरी अधूनमधून येत होत्या. साडेतीन वाजता चोपदारांनी उभे रिंगण लावले. दोन्ही बाजूंनी वारकरी पावले मारण्याचा खेळ खेळत होते. अशात स्वाराच्या व देवाच्या अश्वाने रिंगण पूर्ण केले व माउली माउली करीत सोहळा गोल रिंगणासाठी रस्त्याकडेच्या पटांगणात दाखल झाला.
या सोहळ्यातील शेवटचे गोल रिंगण असल्याने या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती. गर्दी होऊ नये यासाठी वाहतूक गादेगाव मार्गे वळवली होती. रिंगणाच्या वेळीच पुन्हा पावसाने सुरुवात केली. परंतु तरीही भाविक अजिबात हालले नाहीत. त्याच वातावरणात गोल रिंगणात देवाच्या व स्वाराच्या अश्वांनी चार फेऱ्या पूर्ण केल्या. या ठिकाणी पूर्ण पावसाळी वातावरणातही वारकऱ्यांनी अनेक खेळांसाठी फेर धरले. या ठिकाणी बंदोबस्तासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण स्वत: उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा