रायगडातील बाजारपेठांवर दिवाळीचा फीवर चांगलाच चढू लागला आहे. दिवाळीच्या वस्तूंनी बाजारपेठा सजल्या असून, बाजारपेठा ग्राहकांनी गजबजून गेल्या आहेत.
दिवाळीचा सण आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे रायगडातील बाजारपेठा दिवाळीच्या वस्तूंनी गजबजून गेल्या आहेत. निरनिराळ्या आकारांच्या, रंगांच्या पणत्या, रांगोळ्या, आकाशकंदील, फटाके, सुगंधी उटणे तसेच लाइटिंगच्या माळा आणि फराळाच्या पदार्थानी बाजारपेठा सजून गेल्या आहेत. या वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे.
पनवेल, पेण, कर्जत, खोपोली, अलिबाग, मुरुड, रोहा, महाड आणि श्रीवर्धन तालुक्यांतील बाजारपेठा दिवाळीसाठी सज्ज झाल्या आहेत. पारंपरिक कागदी आकाशकंदिलाबरोबर यंदा चायनीज आकाशकंदिलांची धूम आहे. मात्र देशी बनावटीचे आकर्षक कंदील घेण्याकडेच लोकांचा कल दिसून येत आहे.
पारंपरिक मातीच्या पणत्याबरोबर यंदा चिनी मातीच्या तसेच डिझायनर पणत्या बाजारात मोठय़ा प्रमाणात दाखल झाल्या आहेत, मात्र चिनी मातीच्या पणत्याऐवजी पारंपरिक मातीच्या आणि डिझायनर पणत्या घेण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे.
रेडीमेड रांगोळ्याही बाजारात
यंदा रेडीमेड रांगोळ्याही बाजारात मोठय़ा प्रमाणात दाखल झाल्या आहेत. धकाधकीच्या जीवनात रांगोळी काढण्यासाठी वेळ मिळत नसल्याने कामकाज करणाऱ्या गृहिणींची मागणी लक्षात घेऊन या रांगोळ्या बाजारात दाखल झाल्या आहेत. रंगीबेरंगी खडय़ांचा आणि मण्यांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या रांगोळ्या अल्पावधीतच लोकप्रिय होत असल्याचे दिसून येत आहे.
पारंपरिक रांगोळ्यांची मागणी फारशी कमी झाली नसली तरी गृहिणींकडून रेडीमेड रांगोळ्यांना मात्र पसंती दिली जात आहे. अलिबागमधील काही महिला बचत गट तसेच गृहिणींनी या रेडीमेड रांगोळ्यांची निर्मितीही सुरू केली आहे.
रेडीमेड किल्लेदेखील बाजारात दाखल
दिवाळीत मातीचे किल्ले बनवण्याची परंपरा आहे, मात्र अलीकडच्या काळात मातीचे किल्ले बनण्यात मुलांना फारसे स्वारस्य राहिलेले नाही. फ्लॅट संस्कृती वाढल्याने जागा आणि माती उपलब्ध होणे कठीण झाले आहे. शिवाय मुलांनी मातीत खेळू नये याकडेही पालकांचा कल दिसून येतो. ही बाब लक्षात घेऊन आता रेडीमेड किल्लेही बाजारात दाखल झाले आहे. वेगवेगळ्या आकाराचे आकर्षक रंगसंगतीचे प्लास्टर ऑफ पॅरिसने बनवलेले किल्ले बाजारात दाखल झाले. साधारणपणे २०० ते ४५० रुपयांपर्यंत या रेडीमेड किल्ल्यांची विक्री केली जाते. रेडीमेड किल्ल्यांबरोबर शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या आकर्षक मूर्तीही बच्चेकंपनीची मागणी लक्षात घेऊन दाखल झाले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा