मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात उद्या पावसाची शक्यता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोव्हेंबर महिन्यात द्राक्षपीकासह रब्बी हंगामातील शेतपीकांना मारक ठरणाऱ्या पावसाच्या फटक्यातून सावरत असतानाच शेतकऱ्यांसमोर अवकाळीचे नवे भय निर्माण झाले आहे.

दक्षिण कर्नाटक आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असल्याने त्याचा परिणाम सध्या राज्याच्या तापमानावर होत आहे. राज्यात ढगाळ स्थिती निर्माण होऊन तापमानात विचित्र प्रकारे चढ-उतार होत आहे. बहुतांश भागात गारठा कायम असला तरी पुढील तीन ते चार दिवस राज्याच्या दक्षिण भागात हवामान ढगाळ राहणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी बुधवारी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

तापमानस्थिती..

नगर येथे सोमवारी राज्यातील नीचांकी १०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मागील चोवीस तासांत राज्यातील प्रमुख ठिकाणी नोंदविलेले तापमान (अंश से.) पुढीलप्रमाणे- मुंबई (कुलाबा) २३.०, सांताक्रूझ २०.०, अलिबाग २०.२, रत्नागिरी २१.७, पुणे १२.८, जळगाव १३.०, कोल्हापूर १७.४, महाबळेश्वर १५.०, नाशिक, १३.६, सांगली १४.९, सातारा १३.३, सोलापूर १६.६, औरंगाबाद १३.०, परभणी १२.९, नांदेड १५.०, अकोला १५.३, अमरावती १४.८, बुलडाणा १६.४, चंद्रपूर १५.२, गोंदिया १२.०, नागपूर १२.८, वर्धा १४.४ आणि यवतमाळ १४.४.

भीती कसली?

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ासह काही भागांमध्ये मंगळवारी, बुधवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सततचे ढगाळ वातावरण आणि तापमानातील वेगवान चढ-उतार यांच्यामुळे पीकांवर परिणाम होत आहे. त्याचबरोबर विविध प्रकारच्या आजारांनी डोके वर काढले आहे.

थंडीभान..

राज्यामध्ये पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे ढग जमा होत आहेत. परिणामी विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. मात्र उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे या भागात गारठाही कायम आहे. पुढील काही दिवस वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहणार आहे. त्यामुळे उत्तरेबरोबरच ईशान्येकडूनही थंड वारे राज्यात येणार असल्याने थंडी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huge damage due to odd time rain
Show comments