सलग आठ दिवसांहून अधिक काळ ठाण मांडलेल्या अवकाळी पावसाने मंगळवारीही मिरज तालुक्याच्या पूर्व भागात हजेरी लावीत शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले. सुकण्यासाठी रॅकवर टाकलेल्या बेदाण्याचा चिखल झाला असून द्राक्ष बागायतदार पुरता कोलमडून गेला आहे.
सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात मिरज, म्हैसाळ, नरवाड, आरग, बेडग, िलगनूर, खटाव या सीमावर्ती भागात मंगळवारी सायंकाळी अवकाळी पाऊस झाला. या पावसाने रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपीटग्रस्त फळ पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
सांगली जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून दुष्काळी पट्टयात अवकाळी पावसाने गारपिटीसह हजेरी लावल्याने द्राक्ष शेतीसह रब्बी पिकांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. गारपिटीचा सर्वाधिक फटका द्राक्षाचे आगर समजल्या जाणाऱ्या तासगांव तालुक्याला बसला असून अवकाळी पावसाने दहीवडी (ता. तासगांव) येथे एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
जत तालुक्यात माडग्याळ, संख, असंगी, भिवर्गी, तिकोंडा, व्हसपेठ आदी परिसरात सोमवारी सायंकाळी तिसऱ्यांदा गारपिटीने शेती उद्ध्वस्त केली. द्राक्षासोबतच डाळिंब, ज्वारी, मका, गहू, हरभरा आदींचे प्रचंड नुकसान झाले आहे. येळवी परिसरातील पत्र्याची घरे वाऱ्याने उडून गेली.
तासगांव तालुक्यात मांजर्डे, हातनूर, गौरगांव, सिद्धेवाडी, दहीवडी आदी परिसरात गारपिटीमुळे द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज, ढालगांव, शेळकेवाडी, चोरोची आदी परिसरात बेदाणे सुकविण्यासाठी उभारण्यात आलेल्या शेडचे वाऱ्याने नुकसान झाले असून हजारो टन बेदाणा खराब झाला आहे. मिरज तालुक्यातील सलगरे येथे ३५ टन बेदाण्याचे सोमवारी झालेल्या गारपिटीने नुकसान झाले आहे. आटपाडी तालुक्यात करंजी, खरसुंडी, विटा तालुक्यात आळसंद, भाळवणी या गावांतही गारपिटीमुळे फळपिकांची हानी झाली आहे.
अवकाळी पावसाने मिरजेला झोडपले
सलग आठ दिवसांहून अधिक काळ ठाण मांडलेल्या अवकाळी पावसाने मंगळवारीही मिरज तालुक्याच्या पूर्व भागात हजेरी लावीत शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-03-2014 at 03:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huge damage of crops due to odd time rain in miraj