कापूस व सोयाबीनचे प्रचंड नुकसान

चंद्रपूर : सलग तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे कोरपना, राजुरा, जिवती, गोंडपिंपरी, वरोरा, भद्रावती व चंद्रपूर या तालुक्यात शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. सोयाबीन पीक पूर्ण उद्ध्वस्त झाले असून कापसाचीही हानी झाली आहे.

या जिल्हय़ात २५ ते २७  ऑक्टोबर असा सलग तीन दिवस अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोरपना, जिवती, राजुरा, गोंडपिंपरी तालुक्यात अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. सोयाबीन पिकाची कापणी सुरू असतानाच पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. शेतातील उभे असलेले व कापणीला असलेले सायाबीनचे पीक पूर्णपणे भिजले आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक कापून जमा केलेल्या ढिगांना शेतात साचलेल्या पाण्यांनी वेढले आहे. यात सोयाबीन शेंगामध्ये अंकुर निघाले आहे. तर वेचणीला आलेल्या कपासीचे बोंड ओले झाले असून त्यातून अंकुर निघाल्याने शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत सणाच्या तोंडावर शेतकऱ्याची भरणारी रास आता खाली आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे वर्षभराचे बजेट बिघडले आहे. आधीच फसव्या कर्जमाफीच्या आश्वासनाला बळी पडलेला शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे.

शासनाकडून त्यांना मदतीची गरज आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे राजुरा, कोरपना, जिवती आणि गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तेव्हा सदर दयनीय परिस्थिती लक्षात घेऊन नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून तसेच लेखी पत्र पाठवून केली आहे.

Story img Loader