केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाचे वृत्त धडकताच लातूर जिल्हा शोकमग्न झाला. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर मराठवाडा मुंडे यांच्याकडे आशेने पाहात होता. त्यांना केंद्रात मंत्रिपदही मिळाले, मात्र विधिलिखित वेगळेच होते. त्यामुळे मराठवाडा पुन्हा पोरका झाल्याची भावना लातूरकरांनी व्यक्त केली. गेल्या ४० वर्षांपासून मुंडे व लातूरकरांचा जिव्हाळा होता.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्रीय संघचालक डॉ. अशोक कुकडे यांचा मुंडे यांच्या विद्यार्थिदशेपासून जवळचा ऋणानुबंध होता. मुंडे हे जन्मजात नेते होते. कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची त्यांच्याकडे िहमत होती. भाजपचे राज्यातील आजचे जे स्थान आहे, त्यात मुंडे यांचा मोलाचा वाटा होता. त्यांची गृहमंत्रिपदाची कारकीर्दही अतिशय समर्थ होती. ग्रामविकासमंत्री म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा होत्या, मात्र दुर्दैवाने ‘हा हंत हंत, नलिनी गज उज्जहार’ या संस्कृत वचनाप्रमाणे, कमळाचे फूल हत्तीने तोडून न्यावे त्याप्रमाणे नियतीने मुंडे यांना हिरावून नेल्याचे डॉ. कुकडे म्हणाले.
माजी आमदार पाशा पटेल यांची राजकीय कारकीर्दच मुंडे यांच्या प्रेमातून सुरू झाली. मुंडे केंद्रीयमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी खूप काही करण्याची इच्छा होती. १३ जूनला राजेंद्रसिंह राणा, पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत दिल्लीत परिसंवादही घेण्याचे निश्चित झाले होते. राज्यातील कृषी विद्यापीठे शेतकऱ्यांसाठी मंदिराप्रमाणे असायला हवीत. मराठवाडय़ात एक खेडे आदर्श पद्धतीने उभारून संपूर्ण देशासाठी पथदर्शक करण्याची मुंडे यांची इच्छा होती. त्या दृष्टीने त्यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली होती, मात्र हे होणार नव्हते, अशी प्रतिक्रिया पटेल यांनी व्यक्त केली.
राज्यमंत्री अमित देशमुख- देशमुख कुटुंबीयांसाठी हा मोठा धक्का आहे. मुंडे हे विलासरावांचे जवळचे मित्र होते. विलासरावांच्या निधनानंतर त्यांनी आपणास धीर दिला, मार्गदर्शन केले. त्यांच्या जाण्याने आपली वैयक्तिक हानी झाली. शिवाय महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले. देशाच्या राजकारणातील तारा निखळला. मुंडे कुटुंबीयांच्या दु:खात आपण त्यांच्या सोबत आहोत.
माजी राज्यमंत्री दिलीपराव देशमुख- मराठवाडय़ातील शेतकरी, शेतमजूर, अल्पसंख्याक, दलित समाजाचे प्रश्न सोडविण्याचे काम मुंडे यांनी केले. मराठवाडय़ाच्या विकासात त्यांचे योगदान महत्त्वाचे राहिले.
माजी राज्यमंत्री व शेकापचे ज्येष्ठ कार्यकत्रे भाई किशनराव देशमुख- मुंडे यांची मत्री विचारांच्या पलीकडची होती. परळी आपले आजोळ असल्यामुळे मुंडे यांच्या राजकारणाची सुरुवात झाली, तेव्हापासूनच त्यांचा व आपला जवळचा संबंध होता. त्यांच्या निधनाने मराठवाडय़ाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.
पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर- नेता व जनता यांच्यात मुंडे हे कधी अंतरच उरू देत नसत. थेट संवाद साधणारा नेता हरपला. सामान्यांच्या सुखदु:खात समरस होणारा नेता काळाच्या पडद्याआड गेला.
सेंद्रिय खतउत्पादक नीलेश ठक्कर- दिलदार नेता हरपला. महाराष्ट्राची नस न् नस जाणणारा नेता अशी त्यांची ओळख होती.
कीर्ती उद्योग समूहाचे अशोक भुतडा- शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा नेता काळाच्या पडद्याआड गेला. लातूर परिसरात सोयाबीन उत्पादन मोठय़ा प्रमाणात होते. सोयाबीन उत्पादकांचे नेमके प्रश्न काय व सोयाबीनला योग्य भाव देण्यासाठी कोणती धोरणे आखली पाहिजेत याची त्यांना दूरदृष्टी होती.

Story img Loader