राज्यभर सर्वत्र पाऊस पडत असताना कोल्हापूर शहरात शुक्रवारी पैशांचा पाऊस पडला.येथील गांधी मैदानामध्ये शुक्रवारी खेळत असलेल्या लहान मुलांना नोटांचा प्रचंड मोठा ढिग आढळल्याने खळबळ उडाली. या नोटा नकली असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र परीक्षणाअंती या नोटा खऱ्या असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, या नोटा येथे कुठून आल्या याचे गूढ कायम आहे.
शुक्रवारी सकाळी शहरातील गांधी मैदानामध्ये खेळणाऱ्या मुलांना या नोटांपैकी एक नोट मिळाली. चिखलाने माखलेल्या अवस्थेत ही नोट होती. या ठिकाणी अन्य मुलांनी शोध घेतला असता तेथे बऱ्याच नोटा त्यांना आढळून आल्या. या नोटा कुजलेल्या, फाटक्या, जुन्या असलेल्या अवस्थेत होत्या. पण पैसे मिळत असल्याची बातमी हातोहात साऱ्या शहरभर पसरली आणि मैदानवर भर पावसात एकच गर्दी उसळली. यातील काहींनी चांगल्या नोटा घेऊन पोबारा केला. काहींच्या हाती नोटांचे तुकडेच आले. ही माहिती समजल्यावर पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी पडलेल्या नोटा गोळा केल्या. त्याआधारे त्यांनी नोटा कोणाच्या आहेत, याचा शोध सुरू केला आहे.     
गांधी मैदानात पडलेल्या नोटा बनावट असल्याचा संशय सुरुवातीला व्यक्त केला जात होता. पण पोलीस निरीक्षक जयवंत खाडे यांनी नोटा खऱ्या असल्याचे सांगितले. या नोटा एखाद्या भिकाऱ्याने साठवलेल्या असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. पोलिसांनी नोटांची पाहणी केली असता त्यामध्ये १ रुपयापासून ते १ हजार रुपयापर्यंतच्या नोटा दिसून आल्या. त्यांची किंमत तीन हजार रुपये असावी असे सांगण्यात आले.