सातारा जिल्हय़ाच्या पश्चिम भागात आज दिवसभर तुफान पाऊस सुरू असून सर्वच धरणांतील विसर्ग वाढविला आहे. सातारा, महाबळेश्वर, जावली, वाई, मांढरदेव, पाचगणी, खंडाळा, भुईंज या परिसरात सायंकाळपर्यंत जोरदार पाऊस सुरूच होता.
सकाळपासून संततधार सुरूच आहे. रात्रभर आणि सकाळी जोरदार वारे आणि पाऊस सुरू होता. अकरा-बारानंतर पावसाने आपला हेका कायम ठेवत सायंकाळपर्यंत जोर सुरूच ठेवला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. खरीप पिकेही धोक्यात आली आहेत. मागील दोन महिन्यांपासून पावसाने या भागात वस्ती केली आहे. पाऊस सुरू झाल्यापासून पावसाने उसंतच घेतलेली नाही.
सातारा शहर परिसरातही पावसाचा जोर कायम होता. महाबळेश्वर येथे आज दिवसरात्र जोरदार पाऊस सुरू आहे. पाचगणी, मांढरदेव, वाई, जावलीतही हीच परिस्थिती आहे. महाबळेश्वरच्या पावसाने कोयनेबरोबरच अन्य धरणांच्या पातळीत भरघोस वाढ होत असल्याने सर्वच धरणांतील विसर्ग वाढविला आहे. उरमोडीचे चारही दरवाजे पुन्हा उघडण्यात आले असून, बलकवडीचे तीनही दरवाजे पुन्हा उघडण्यात आले. उरमोडीत ४२५० क्युसेक, बलकवडीतून ३५०० क्युसेक, धोम धरणातून विसर्ग वाढविण्यात आला असून पुन्हा सात हजार १०० क्युसेकपर्यंत पाणी कृष्णा नदीत सोडण्यात आले. धरणाचे सर्व पाचही दरवाजे दोन फुटाने वर उचलण्यात आले असल्याचे धोम धरणाचे अभियंता पी. एस. पाटील यांनी सांगितले.
कृष्णा नदीला पाणीपातळी वाढल्याने चिंधवली व खडकी (ता. वाई) या गावांचा संपर्क तुटला आहे. या पावसाने जनजीवनावर परिणाम झाला असून, बाजारपेठेतील उलाढालही ठप्प झाली आहे.
दरम्यान, वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यांत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करण्याचा आदेश आमदार मकरंद पाटील यांनी कृषी विभागाला दिला आहे.
जिल्हय़ात पावसाचे प्रमाण दुपटीने वाढले असले तरीही कोरेगाव, खटाव, माण येथे छावण्या सुरूच आहेत. येथे पावसाने पूर्णत: पाठ फिरवली आहे. फलटण येथेही हीच परिस्थिती आहे. धरणे भरल्याने नदीतून होणाऱ्या विसर्गाबरोबरच धरणांच्या कालव्यातून दुष्काळी भागात पाणी सोडण्यात आले असून ओढेनाले जिथून पाणी वाहील तिथे सोडण्यात आले आहे. धोमचे पाणी कोरेगावात पोहोचले असून धोम डाव्या कालव्यातून दोनशे क्युसेक पाणी कोरेगाव खटावसाठी सोडले आहे. तर बलकवडीच्या कालव्यातून खंडाळा, फलटण येथील दुष्काळी भागासाठी धोम धरणातून पन्नास क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी आज लोणंदपर्यंत पोहोचले. कालव्यात दुरुस्तीची कामे सुरू आहेत ती आटोपताच आणखी पाणी वाढविण्यात येणार आहे. हे पाणी सध्या फलटण तालुक्यातील बीबीपर्यंत पोहोचणार आहे. या भागातील गाव तलाव व पाझर तलाव भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
वाई शहर व तालुका परिसरात आज सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली यामुळे ओढय़ांना पाणी आले. कृष्णा नदीत धोम धरणातून सात हजार १०० क्युसेक पाणी सोडल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. महागणपती मंदिराला पाणी लागले आहे. पाऊस उघडीप देईल असे वाटत असताना जोरदार पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात होते. पावसाने पीकपाणी धोक्यात आले आहे.

Story img Loader