बिबटय़ांना जेरबंद केल्यानंतर ऊठसूट ताडोबाच्या बफर झोनमध्ये सोडण्यात येत असल्याने बफर झोनमध्ये बिबटय़ांनी माणसांवर हल्ले करण्याच्या घटनांत अचानक वाढ झाली आहे. त्यामुळे अशा नरभक्षक वन्यजिवांना इतर ठिकाणच्या संरक्षित जंगलात नेऊन सोडले, तर मानव-वन्यजीव संघर्ष कमी होईल, असा मतप्रवाह सुरू झाला असून वन खाते यावर गांभीर्याने विचार करीत आहे.
उन्हाळा सुरू होताच ताडोबा परिसरातील गावांमध्ये मानव-वन्यजीव संघर्षांत वाढ होत असल्याचे चित्र आता नित्याचे झाले आहे. पाणी आणि सावजाच्या शोधात जंगलाबाहेर पडलेले प्राणी माणसांवर हल्ले करीत आहेत. गेल्या २० दिवसांत या जिल्हय़ात अशा हल्ल्यात ६ जण ठार झाले. यातील बहुतांश हल्ले बिबटय़ांनी केलेले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून असा हल्ला झाला की वनखात्याचे अधिकारी प्राण्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावतात. त्यात प्राणी सापडले की त्यांना सर्वात सुरक्षित क्षेत्र म्हणून ताडोबाच्या बफर झोनमध्ये सोडले जाते. वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात प्रामुख्याने बिबटे अडकतात. गेल्या वर्षभरात ताडोबाच्या बफर झोनमध्ये २० पेक्षा जास्त बिबटे सोडण्यात आले आहेत. आता या बफर झोनमध्ये असलेल्या ९७ गावांमध्येसुद्धा बिबटय़ांच्या माणसांवरील हल्ल्यांत वाढ झाल्याने वनखात्यात बिबटय़ांना जंगलात सोडण्यासाठी नव्या पर्यायावर विचार सुरू झाला आहे.
गेल्या शुक्रवारी याच बफर झोनमध्ये बिबटय़ाने एका तरुण मुलीचा बळी घेतला. या बिबटय़ाला पकडण्यासाठी चोरगाव व अडेगाव येथे दोन पिंजरे लावण्यात आले असले तरी अद्याप हा बिबटय़ा जेरबंद झालेला नाही. या घटनेमुळे बफर झोनमध्ये असलेल्या गावांमध्ये सध्या संतापाचे वातावरण आहे. गेल्या महिनाभरात बफर झोनच्या बाहेर असलेल्या जंगलात बिबटय़ांनी हल्ले केल्यानंतर त्यांना जेरबंद करून याच बफरझोनमध्ये सोडण्यात आले होते. आता हेच बिबटे नव्याने हल्ले करत आहेत, अशी भावना गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. या पाश्र्वभूमीवर आता बिबटय़ा जेरबंद झाला की त्याला इतर अभयारण्यात सोडण्यावर विचार केला जात आहे. शेजारच्या गडचिरोली जिल्हय़ात चपराळा व भामरागड अशी दोन अभयारण्ये आहेत. या दोन्ही ठिकाणी वन्यजीव मात्र नाहीत. त्यामुळे या अभयारण्यात बिबटे सोडले तर त्याचा फायदा होईल, असे वन्यजीवतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
या दोन्ही अभयारण्यांत गावांची संख्यासुद्धा कमी आहे. परिणामी मानव-वन्यजीव संघर्षसुद्धा कमी होईल असा तर्क हे प्रेमी देत आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणानेसुद्धा जेरबंद केलेल्या प्राण्यांना सोडण्याच्या बाबतीत अनेक मार्गदर्शक सूचना वनखात्याला केलेल्या आहेत. यात हल्ले करणाऱ्या प्राण्यांना जिथे प्राणी कमी आहेत अशा जंगलात सोडावे अशीही सूचना आहे. वनखात्याचे अधिकारी आजवर त्याचे पालन करत नव्हते. आता हल्ल्यात वाढ झाल्याने या सूचनेवर अधिकाऱ्यांच्या वर्तुळात गांभीर्याने विचार सुरू झाला आहे. ताडोबाचे क्षेत्र संचालक वीरेंद्र तिवारी यांना याबाबत विचारले असता केवळ बफर झोनमध्ये बिबटे सोडण्याऐवजी इतर ठिकाणी सोडले तर चांगलेच होईल असे ते म्हणाले. ताडोबाचे जंगल सर्वाधिक सुरक्षित असल्याने आजवर प्राणी सोडण्यासाठी याच जंगलाला प्राधान्य देण्यात येत होते असे ते म्हणाले. अडेगाव येथे पकडण्यात आलेला बिबटय़ा अजूनही जेरबंदच असून चोरगावचा बिबटय़ा जेरबंद झाल्यानंतर या दोन्ही प्राण्यांना ताडोबाच्या बाहेरच्या जंगलात सोडण्याची भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे. यंदा हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याने वनखात्याच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा गावांमध्ये सभा घेऊन लोकजागृती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
भरपाई आता पाच लाखांची
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला आता दोन लाखांऐवजी पाच लाखाची भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या संबंधीचा आदेश चार दिवसांपूर्वी जारी झाला. ही भरपाई वाढवून मिळावी, अशी मागणी सर्वच स्तरातून केली जात होती.

Story img Loader