प्राण्यांना बदनाम करण्याचा मानवी स्वभाव असला, तरी माणूसच खऱ्या अर्थाने प्राण्यांपेक्षा हिंस्रपणे वागू लागला आहे. त्या दोन पायांच्या प्राण्यांनीच नरेंद्र दाभोलकरांची हत्या केली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी एका मुलाखतीच्या दरम्यान व्यक्त केली.
कांतीलाल प्रतिष्ठान आयोजित महागणपतीच्या दर्शनाला आलेल्या आमटे दाम्पत्याच्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आकाशात चमकणाऱ्या विजा आणि पर्जन्यधारा सुरू असतानाही आमटे यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. अनुपमा ताकमोघे यांनी ओघवत्या शब्दात उपस्थित केलेल्या प्रश्नांना आमटे दाम्पत्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
आमटे यांनी सरकारी आणि खासगी डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवरही तीव्र नापसंती व्यक्त केली. या वेळी ते म्हणाले, ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना गलेलठ्ठ पगार हवा असतो. त्या मोबदल्याच्या १० टक्के जरी त्यांनी रुग्णसेवा दिल्यास ग्रामीण आणि विशेषत: आदिवासी भागातील रोगराई दूर होईल, शिवाय विविध आजारांवर वेळीच उपचार झाल्यास त्यांना प्राणाला मुकावे लागणार नाही. खासगी डॉक्टरांनी येणाऱ्या रुग्णांची आत्मीयतेने काळजी घेतल्यास अथवा त्यांच्यावर उचित उपचार केल्यास डॉक्टर आणि रुग्णालयांवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण निश्चितच कमी होईल. मात्र, त्याकडे डॉक्टरांचा कल राहिलेला नसून आíथक समीकरणांभोवती वैद्यकीय सेवा फिरू लागली असल्याचे मत त्यांनी मांडले.
बाबांनी सहलीला नेले आणि त्या वातावरणाचा परिणाम झाला, तेथूनच आदिवासी भागातील रुग्ण, कुष्ठरोगी, पीडितांची सेवा करण्याची प्रेरणा मिळाली असे सांगत विकास आणि माझे कुटुंब बाबांच्या आदर्शवत संस्कारामुळे त्यांचे कार्य पुढे चालविण्याचा प्रयत्न करीत आहोत. इतकेच नाही तर आता जे महागडय़ा आणि सुसंस्कारित शाळांचे पेव फुटले आहे ती हवा आमच्या डोक्यात जाऊ न देता आम्ही ६५० आदिवासी मुलांची शाळा चालवीत आहोत, अशी माहिती देतानाच त्यांची नातवंडे त्या आदिवासी शाळेत शिकत असल्याचे अभिमानाने सांगितले. तसेच बाबांची चौथी पिढीही सेवेत उतरल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा