लोकसत्ता प्रतिनिधी

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे समुद्रकिनाऱ्यावर मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली आहे. याविषयीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा करत हा सांगाडा ताब्यात घेतला. मात्र हा सांगाडा स्त्री किंवा पुरुषाचा आहे हे अद्याप स्पष्ट होवू शकले नाही.

तालुक्यातील रनपार येथील काही लोक मासेमारी करण्यासाठी खाडीत गेले असताना हा सांगाडा आढळून आला. याविषयी गुरुवार दि. १७ एप्रिल रोजी गणेशगुळे पोलीस पाटील संतोष लाड यांच्याशी मच्छीमारांनी संपर्क साधून याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटलांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी पोहचून मानवी सापळ्याचा पंचनामा केला. तसेच हा मानवी सांगाडा पुढील तपासणीसाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.

याबाबत पोलिसांकडून सांगण्यात येत आहे की, हा मानवी सांगाडा महिलेचा की पुरुषाचा आहे, हे अंतिम तपासणी झाल्यावरच कळणार आहे. त्याची डीएनए तपासणी झाल्यानंतर त्याचे वय आणि अन्य माहिती समजू शकेल. मात्र या पुर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेले तीन महिने एक गृहस्थ बेपत्ता असून तो अद्याप सापडलेला नाही. मात्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार या मृतदेहाच्या डीएनए चाचणीनंतरच हा सापळा कोणाचा आहे, हे स्पष्ट होणार आहे.