पंधरा वर्षांत १५० जणांचा मृत्यू
खरकाडाच्या जंगलात अस्वलांच्या हल्ल्यात दोन दिवसांपूर्वी मृत्युमुखी पडलेले तीन गावकरी तथा ताडोबा कोअर झोनमध्ये एका अग्नीसंरक्षकाचा वाघाच्या हल्ल्यात झालेला मृत्यू बघता या जिल्हय़ात मानव-वन्यजीव संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाल्याचे दिसत आहे. प्रत्यक्षात हा संघर्ष वन्यप्राण्यांकडून कमी आणि मानवाने वन्यप्राण्यांच्या अधिवास क्षेत्रात अर्थात जंगलात प्रवेश केल्यामुळे अधिक होत असल्याचे प्रत्येक घटनांचा अभ्यासपूर्ण आढावा घेतल्यानंतर दिसून येते. मागील पंधरा वर्षांचा विचार केला तर १५०च्या वर लोक मानव-वन्यजीव संघर्षांत बळी पडले आहेत.
मानव-वन्यजीव संघर्षांचा इतिहास शेकडो वर्षांचा आहे. अलीकडच्या काळात त्यात वाढ झाली आहे. त्याला कारण मानवाचा वन्यप्राण्यांच्या अधिवासात प्रवेश, बेसुमार वृक्षतोड, त्यातून घटत गेलेले जंगलाचे प्रमाण आणि वेगाने विस्तारत असलेले नागरी जीवन. यामुळे हा संघर्ष सध्या चरमसीमेवर आहे. जंगलात राहणाऱ्या प्राण्यांना आवश्यक असलेले सर्व घटक जंगलात उपलब्ध आहेत. त्याला लागणारी शिकार, पिण्याचे पाणी व अधिवासाकरिता आवश्यक असलेली जागा हेच ते तीन घटक. मात्र अलीकडच्या काही वर्षांत वन्यजीवांना लागणारी शिकार मानवानेच फस्त करणे सुरू केले. त्याशिवाय जंगलाचा आकारसुद्धा कमी झाला. प्रामुख्याने ज्या भागात जास्त जंगल आहे त्या भागात प्राण्यांची संख्या वाढली पण अधिवासाचे क्षेत्र कमी झाले. त्याचा परिणाम प्राणी जंगलाबाहेर पडण्यात झाला आणि या संघर्षांत वाढ झाली. त्याचबरोबर मानवाचा जंगलातला वावरसुद्धा अलीकडच्या काळात कमालीचा वाढला आहे. त्यामुळे संघर्षांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. खरकाडाच्या जंगलात अस्वलाने ज्या पद्धतीने जंगलात तेंदूपत्ता वेचण्यासाठी गेलेल्या सहा लोकांवर हल्ला केला व त्यातील बिसन सोमाजी कुळमेथे (५०), फारुख युसूफ शेख (३१), रंजना अंबादास राऊत (५०) या तिघांना ठार केले. यात पूर्णपणे मानवाची चूक स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेष म्हणजे मागील पाच महिन्यात वन्यजीवांच्या हल्ल्यात ज्या १५ लोकांचा बळी गेला, त्या सर्व घटना या जंगल क्षेत्रातच झालेल्या आहेत.
ताडोबाच लक्ष्य
अभ्यासकांच्या मते ९० टक्के घटना या जंगलात होत असून १० टक्के घटनांमध्ये वन्यप्राणी जंगलाबाहेर वस्तीत सावज व पाण्याच्या शोधात येतो तेव्हाच हल्ले करतो. संपूर्ण राज्यात ताडोबाच्या सभोवताल असलेल्या जंगलात अशा संघर्षांच्या घटना सर्वात जास्त आहेत. त्याला कारणेही अनेक आहेत. ताडोबा संरक्षित क्षेत्र असल्याने तेथे प्राण्यांची संख्या भरपूर आहे. चांगल्या संरक्षणामुळे या प्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. आता जागा कमी पडू लागल्याने हे प्राणी अधिवासाच्या शोधात बाहेर येऊ लागले आहेत. वाघ, बिबटय़ा, अस्वल, रानम्हशी हे प्राणी संघर्षांत आघाडीवर असतात. यांना खाण्यासाठी आवश्यक असलेले प्राणी हरीण, नीलगाय, डुक्कर जंगलाच्या वेशीवर वास्तव्य करण्यात धन्यता मानतात. कारण त्यांची जीवनशैलीच तशी आहे. या सावजाला शोधण्यासाठी बाहेर येणारे हे प्राणी मग सावज सापडले नाही की मानवाला लक्ष्य करतात. या प्राण्यांच्या तडाख्यात प्रामुख्याने गुराखी तथा वनउपजाच्या शोधात जंगलात भटकणारे गावकरी सापडतात. कारण या गुराख्यांना जंगलात जाण्याशिवाय पर्याय नसतो. जंगल अथवा त्याच्या शेजारी राहणाऱ्या मानवाची जीवनशैलीसुद्धा तशीच आहे. या साऱ्यांचा रोजगार, शेती प्रामुख्याने जंगलावर अवलंबून असते. वन्यजीवाची कितीही भीती असली तरी त्याला शेतात जावेच लागते. जंगलाशेजारची गावे जंगलातील वनउत्पादनांवर अवलंबून असतात. मोह, डिंक, तेंदूपाने, बांबू तोडण्यासाठी या गावांना जंगलात जावेच लागते. प्रामुख्याने उन्हाळय़ात शेकडो गावकरी मोह, डिंक व तेंदूपाने गोळा करण्यासाठी जंगलात जातात. कारण त्यावरच त्यांची रोजीरोटी अवलंबून असते. वन्यप्राण्यांच्या भीतीमुळे अनेक गावकरी सामूहिकपणे जंगलात जातात. अशावेळी तिथे हजर असलेल्या वन्यजीवाला हे लोक आपल्याला मारण्यासाठी आलेले आहे. त्यांनी आपल्याला घेरले आहे असे वाटते. यातून निर्माण होणाऱ्या असुरक्षिततेतून मग ते मानवावर हल्ला करतात. दुर्दैवाने याच काळात जंगलातले पाणवठे आटलेले असतात. त्यामुळे प्राणी पाण्याच्या शोधात जंगलाच्या वेशीपर्यंत येतात. नेमकी इथेच त्यांची गाठ मानवाशी पडते व संघर्ष निर्माण होतो. हा संघर्ष नियंत्रणात आणणे शक्य आहे. मात्र हे नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने सुचवलेल्या उपाययोजनासुद्धा पुरेशा नाहीत. मानवाने जंगलातच जाऊ नये असे अधिकारी सांगतात पण हे सांगताना त्यांच्या रोजगाराचे काय यावर त्यांच्याकडे उत्तर नसते. मध्यंतरी याच संघर्षांने अतिरंजित रूप घेतल्याने वाघाला गोळय़ा घालून ठार करावे लागले. त्याचीच पुनरावृत्ती खरकाडात अस्वलाला गोळय़ा घालाव्या लागल्या. हासुद्धा यावरचा उपाय नाही, पण संतप्त जनभावनेपुढे सरकारला अनेकदा झुकावे लागते. अनेकदा जंगलाच्या शेजारी असलेली शेती वन्यप्राणी नष्ट करतात. त्यातून मिळणारी नुकसान भरपाई अतिशय अल्प आहे. यामुळे शेतकरी शेतात विजेचे प्रवाह सोडतात व त्यात वन्यजीव मारले जातात. ब्रह्मपुरी वन विभागात शेतकऱ्यांनी नुकतीच ‘जय’ या बेपत्ता वाघाचा छावा ‘श्रीनिवासन’ याची जिवंत विद्युतप्रवाह सोडून शिकार केली. त्यामुळे या मुद्दय़ावर आणखी जनजागृती होणे आवश्यक आहे. दुर्दैवाने त्याकडे कुणीही गांभीर्याने बघत नाही. आता वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एखादा इसम ठार झाला तर त्याला ८ लाख रुपये देण्याची तरतूद शासनाने केली आहे. या उपाययोजनासुद्धा हा संघर्ष थांबवू शकत नाही. एकटय़ा चंद्रपूर जिल्हय़ाचा विचार केला तर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात दरवर्षी १५ ते २० लोकांचा बळी जातो. प्राण्यांना बेशुद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान व कौशल्य आत्मसात केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या या खात्यात फार कमी आहे.
मनुष्यहानी, जखमी, शेतपीक व पशुधन हानीत गेल्या वर्षभरात ११ हजार २२४ प्रकरणात एकूण सहा कोटी २७ लाखाचे सानुग्राह अनुदान गावकऱ्यांना वितरित करण्यात आलेले आहे. तसेच ताडोबा व चंद्रपूर क्षेत्रातील एकूण २५ हजार कुटुंबांना एलपीजी गॅसचे वितरण करण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबाला घरी शौचालय बांधून देण्यात आले आहे. तरी गावकरी जळावू लाकडे व प्रातर्विधीसाठी जंगलाचा मार्ग पत्करत असल्यानेही घटनांमध्ये वाढ झाली आहे.
वाघ व बिबटय़ांची वाढलेली प्रचंड संख्या बघता या जिल्हय़ातील सात ते आठ वाघ पैनगंगा अभयारण्यात किंवा गडचिरोली जिल्हय़ातील चपराळा अभयारण्यात स्थलांतरित करावे असा प्रस्ताव चंद्रपूर मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने गेल्या वर्षी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण तसेच वन विभागाला पाठविला होता. मात्र हा प्रस्ताव सध्या धूळखात पडलेला आहे. यावर कुठलाही विचार झालेला नाही.
लोकांची किंबहुना जंगलालगतच्या गावकऱ्यांची जंगलावरची निर्भरता कमी करण्यासाठी शासनाकडून आवश्यक उपाययोजना आखण्याची गरज आहे. तसेच लोकांनीही जंगलात जाताना आवश्यक ती सतर्कता ठेवणे तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काळजी घेणे आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टी साध्य झाल्या तर मानव-वन्यजीव बऱ्याच अंशी कमी होईल.
– गजेंद्र नरवणे, उपवनसंरक्षक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (बफर)
२००२ ते २०१४ या १२ वर्षांच्या काळात वन्यजीव व मानव संघर्षांत एकूण १५०च्या आसपास लोकांचा जीव एकटय़ा चंद्रपूर जिल्हय़ात गेला आहे. यापैकी १७ माणसे डुकरांनी मारली आहेत. एकूण जी माणसे मृत पावली आहेत त्यापैकी ९० टक्के जंगलात म्हणजेच वन्यप्राण्यांच्या अधिवासात मारली गेली आहेत. फेब्रुवारी ते जूनपर्यंत संघर्षांच्या घटनांमध्ये दरवर्षी वाढ होते. जून ते डिसेंबर या काळात घटना कमी होतात. मार्च, एप्रिल व मे हे तीन महिने सर्वात जास्त घातक आहेत.
– प्रा.डॉ. योगेश दुधपचारे, मानव-वन्यजीव संघर्षांचे अभ्यासक