मराठीतील विनोदी लेखक व कथाकथनकार दत्ताराम मारुती मिरासदार यांचे आज निधन झाले आहे. त्यांचा जन्म १४ एप्रिल, १९२७ मध्ये झाला होता. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं आहे. ते ९४ वर्षाचे होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिरासदार यांचे शिक्षण अकलूज, पंढरपूर येथे झाले होते. पुण्यात आल्यावर ते एम्‌.ए. झाले. काही वर्षे पत्रकारिता केल्यानंतर त्यांनी इ. स. १९५२ साली अध्यापनक्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कॅंप एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. १९६१ मध्ये ते मराठीचे प्राध्यापक झाले.

मराठीतील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे यांनी जोपासलेली विनोदी लेखनाची परंपरा द. मा. मिरासदारांनी पुढे सुरू ठेवली. मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि त्याचे उत्तम सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत.

मराठी साहित्य क्षेत्रातील कादंबरी, विनोदी कथा, वगनाटय, चित्रपट संवाद, विविध विषयांवर लेख इत्यादी सर्व साहित्य प्रकार प्रा. मिरासदार यांनी लीलया हाताळले आहे. राज्य पुरस्कार, गदिमा पुरस्कार, अत्रे पुरस्कार, अश्या अनेक पुरस्कारांनी त्यांना यापूर्वी गौरविण्यात आले होते. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Humorous writer and storyteller dattaram maruti mirasdar passes away srk