सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाल्यामुळे धरणातून भीमा नदीच्या पात्रासह कालव्यावाटे पाणी सोडणे सुरूच आहे. धरणातील पाण्याने जिल्ह्यात सर्व तलाव, बंधारे आणि मध्यम प्रकल्प भरून घेतले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून उजनीतून सोडलेले पाणी अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरसाठी कुरनूर धरणात पोहोचले आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यांतील ७२ गावांना पाणी मिळणार आहे. यातून १७ हजार ३१० हेक्टर क्षेत्रात शेतीचे सिंचन होणार आहे.

तथापि, उजनी धरणाचे पाणी अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात मिळण्याची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. या प्रश्नावर विधानसभेच्या अनेक निवडणुका लढल्या गेल्या. अलीकडे उपसा सिंचन योजना टप्प्याटप्प्याने मार्गी लागल्यानंतर उजनीचे पाणी मिळविण्यावरून राजकीय नेत्यांमध्ये श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले आहे. त्यास आता आगामी विधानसभा निवडणुकीची किनार लाभली आहे. अक्कलकोटचे भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात उजनीच्या पाण्याचे राजकारण पुन्हा समोर आले आहे.

हेही वाचा >>>राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान…जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांत किती नुकसान…

उजनी धरणाचे पाणी अक्कलकोट व दक्षिण सोलापूरला मिळण्यासाठी प्रथम एकरूख उपसा सिंचन योजनेवाटे एकरूख तलावात सोडण्यात आले आहे. हे पाणी पुढे रामपूर तलाव व अन्य मार्गाने मजल दर मजल करीत अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणात पोहोचले आहे. हे धरण सुमारे ८० टक्के भरून घेतले जाणार आहे.अक्कलकोट तालुक्यातील ५१ तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील २१ गावांना या पाण्याचा लाभ मिळणार आहे. मागील वर्षी उजनीचे पाणी अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्याला मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन झाले होते.