लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शविण्यासाठी बाधित होणार्या गावातील शेकडो शेतकर्यांनी गुरूवारी प्रांताधिकार्यांकडे हरकती नोंदवल्या.
सांगली जिल्ह्यातील १९ गावामधून जाणार्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकर्यांनी विरोध दर्शवला असून यासाठी आंदोलन सुरू केले आहे. या महामार्गाबाबत दि.२८ फेब्रुवारीला काढण्यात आलेल्या अधिसूचनेवर बाधित शेतकर्यांनी हरकती नोंदवल्या होत्या. तथापि, या हरकतीवर कोणतीच सुनावणी न होता, बांधकाम विभागाकडून दि.७ जून रोजी भूसंपदानाबाबतची अधिसूचना प्रसिध्द केली. ही बाब कायद्यानुसार नाही. यामुळे आज बचाव कृती समितीच्यावतीने सामुहिकपणे मिरजेतील प्रांत कार्यालयात हरकती नोंदविल्या.
आणखी वाचा-सांगलीत ४५ लाखाचा प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त
यावेळी समितीच्यावतीने अधिसूचनेवर तातडीने सुनावणी घ्यावी आणि शेतकर्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी सतिश साखळकर, उमेश देशमुख, प्रभाकर तोडकर, प्रविण पाटील, उमेश एडके, विष्णु पाटील,यशवंत हारूगडे, उदय पाटील आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.