११ मार्चपासून संपाचा इशारा
नवीन वेतनवाढ करार करण्यास व्यवस्थापनाकडून त्वरित पावले उचलण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ येथील महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र कामगार संघटनेने सोमवारपासून कामगार भवनसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. संघटनेने ११ मार्चपासून संपावर जाण्याची नोटीस याआधीच व्यवस्थापनाला दिली आहे.
नवीन वेतनवाढ करारासाठी संघटनेने ६ ऑगस्ट २०१२ रोजी व्यवस्थापनास मागण्यांचे निवेदन सादर केले होते. आधीचा करार ५ फेब्रुवारी २०१३ रोजी संपल्यानंतरही व्यवस्थापनाकडून वेतनवाढ करारासंदर्भात ठोस चर्चा सुरू करण्यात आलेली नाही, असा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. याआधीही व्यवस्थापनाकडून करार करण्यास दिरंगाई झालेली असल्याने त्याची पुनरावृत्ती यावेळी करण्यात येत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. उत्पादन वाढीशी निगडित पगारवाढ हे व्यवस्थापनाचे धोरण असून वाढत्या महागाईच्या पाश्र्वभूमीवर केवळ उत्पादन वाढीचीच चर्चा हे धोरण आपणास मान्य नाही असे संघटनेने नमूद केले आहे. व्यवस्थापनाच्या आडमुठय़ा धोरणाविरोधात सर्व कामगार ११ मार्चपासून संपावर जाणार आहेत, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष शिरीष भावसार, जनरल सेक्रेटरी प्रवीण शिंदे यांची स्वाक्षरी आहे.