लोकसत्ता वार्ताहर

परभणी : जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकर्‍यांचा ३३५ कोटी रूपयांचा पीकविमा अग्रीम अडकून पडला असून त्यासाठी राज्य सरकारने पीकविमा कंपनीला ९९ कोटी रूपयांची थकीत असलेली रक्कम तात्काळ वर्ग करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथे गोदावरी नदीच्या पात्रात उपोषण सुरु करण्यात आले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. तुमचे ‘फोटोसेशन’ झाले असेल तर बाहेर या असे पूर्णेच्या तहसीलदारांनी आंदोलनकर्त्यांना भ्रमणध्वनीद्वारे ऐकवल्याने आंदोलनकर्ते चिडले.

यापूर्वी शेतकरी संघटनेच्यावतीने एक महिन्यापूर्वी जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आठ दिवसात पिकविम्याच्या अग्रीमचा प्रश्न मार्गी निघेल असे आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिले. मात्र अद्यापही या प्रश्नी निर्णय झाला नाही. त्यानंतर पुन्हा आज गुरुवारी (दि.२०) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने किशोर ढगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु झाले. यावेळी त्यांच्या समवेत तुकाराम दुधाटे, माऊली शिंदे, नागेश दुधाटे, रामप्रसाद गमे, विष्णु दुधाटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यकर्त्यांनी गोदावरीनदीच्या पात्रात देऊळगाव दुधाटे येथे तराफ्यावर बसून उपोषण सुरु केले. जोपर्यंत पीकविमा मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाहीत अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली.

आंदोलनकर्ते गोदावरी नदीच्या पात्रात आल्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली. नदीच्या किनार्‍यावर पोलिस मोठ्या संख्येने जमा झाले. प्रशासनाच्यावतीने आंदोलनकर्त्यांशी मोबाईद्वारे चर्चा सुरु झाली. तथापि आंदोलनकर्ते ऐकायला तयार नव्हते. एवढ्यातच मोबाईलवरून बोलताना तुमचे ‘फोटोसेशन’ झाले असेल तर बाहेर या असे उद्गार पूर्णेचे तहसीलदार माधव बोथीकर यांनी मोबाईलवरून संपर्क साधताना काढले. त्यानंतर कार्यकर्ते आणखीच संतप्त झाले. तुम्ही आंदोलनकर्त्यांची चेष्टा चालवली का? तुम्हाला त्यांच्या जिवाचे काही देणे घेणे आहे की नाही असे यावेळी किशोर ढगे यांनी तहसीलदार यांना सुनावले. दरम्यान उशिरापर्यंत हे आंदोलन सुरुच होते.

Story img Loader