जिल्हा ‘जातीय अत्याचारग्रस्त’ म्हणून जाहीर करावा यासह जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांच्या कारकीर्दीतील दलित अत्याचारांच्या प्रकरणांची सीबीआयमार्फत चौकशी करावी आदी मागण्यांसाठी जातीय अत्याचार विरोधी संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
कॉ. अनंत लोखंडे, एन. एम. पवळे, सुनील शिंदे, दिलीप सकट, सुभाष आल्हाट, कॉ. अनिता कोंडा, सुनील उमाप, गिरीश नेटके, कॉ. सुधीर टोकेकर, भगवान जगताप, अनिल ओहोळ आदींनी उपोषणात सहभाग घेतली.
खर्डा येथील दलित युवकाच्या हत्येच्या पाश्र्वभूमीवर समितीने हे आंदोलन केले. दलित, अल्पसंख्याकाविरोधातील जातीय अत्याचारांच्या घटनांमुळे संबंधित सरकारी विभागांच्या कार्यपद्धतीबद्दलही समाजात मोठा असंतोष निर्माण झाला असल्याकडे जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात लक्ष वेधण्यात आले. खर्डा येथील मुख्याध्यापक व वर्गशिक्षकांनाही सहआरोपी करून त्यांची नार्को टेस्ट करावी, नितीन आगे याच्या शवविच्छेदन अहवालात फेरफार करणा-या वैद्यकीय अधिका-यासही सहआरोपी करावे, जिल्हय़ातील गेल्या पाच वर्षांतील दलित अत्याचारांच्या घटनांबाबत जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखालील अस्पृश्यता निवारण समितीच्या कामाकाजाची चौकशी करून दोषी सदस्यांवर कारवाई करावी, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

Story img Loader